ठाकरे गटाला बारामतीत धक्का! पदाधिकारी, जिल्हाप्रमुखांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 08:45 IST2025-03-21T08:41:59+5:302025-03-21T08:45:09+5:30
Shiv Sena Shinde Group: ठाकरे गटासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील पदाधिकारी शिवसेना शिंदेसेनेत सामील झाले.

ठाकरे गटाला बारामतीत धक्का! पदाधिकारी, जिल्हाप्रमुखांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
Shiv Sena Shinde Group: ठाकरे गटातून शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या दृष्टीकोनातून शिवसेना शिंदे गटातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा वाढता ओघ हा एकनाथ शिंदे यांची ताकद वाढवणारा असून, दुसरीकडे मात्र ठाकरे गटासाठी चिंतेचा विषय ठरणारा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. एकामागून एक शिवसेना शिंदे गटात होत असलेले पक्ष प्रवेशाने ठाकरे गटातील गळती थांबत नसल्याचेच पाहायला मिळत आहे. आता बारामतीत ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यभरातील ठाकरे गटाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे ठाकरे गटासह आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातूनही शिंदेसेनेत इन्कमिंग सुरू झाल्याचे दिसत आहे. मुंबई, पुणे व रायगड जिल्ह्यातील ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी एक्सवर पोस्ट करून दिली आहे.
ठाकरे गटाचे बारामतीतील जिल्हाप्रमुख, पदाधिकारी शिंदेसेनेत
ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका आणि बारामती जिल्हाप्रमुख कल्पना थोरवे, विधी विभागाचे प्रमुख संभाजी थोरवे, पुणे उप-शहरप्रमुख नितीन पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आगरी कोळी समाजाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोहर ठाकूर, उरणचे योगशे बापर्डेकर, ठाकरे गटाच्या दैनंदिनीची निर्मिती करणारे साकेत पवार आणि व्यवस्थापक स्वप्नील माने, सुनील जाधव, रुपेश सुर्वे यांनीही मूळ शिवसेनेत प्रवेश घेतला. तसेच मानव आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील चौधरी यांच्यासह फाउंडेशनचे सदस्य नयन सिंग, महेश शर्मा, संजय सोलंकी, जगदिश कुमावत, सुरेश चौधरी, प्रवीण चौधरी, सिताराम चौधरी, दिनेश चौधरी, नरेश प्रजापती, राजेंद्र मुळे, संजय देशमुख आणि त्यांचे सर्व सहकारी शिवसेनेमध्ये दाखल झाले, असे एकनाथ शिंदे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, मुंबईत पालिकेची निवडणूक जेव्हा जाहीर होईल तेव्हा मुंबईतील सर्व प्रभागात लढता येतील एवढे उमेदवार जमवण्यासाठी शिंदे यांच्या शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. ठाकरेंचे एक-एक उमेदवार गळाला लावण्यात शिंदे यशस्वी होत आहेत. मुंबईतील तीन माजी नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांना ‘जय महाराष्ट्र’ करीत शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. मुंबईतील भांडुपमधील माजी नगरसेवक उमेश पाटील, चेंबूरच्या माजी नगरसेविका अंजली नाईक आणि गोरेगाव येथील माजी नगरसेविका लोचना चव्हाण यांच्यासह अनेक पदाधिकारी, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख आणि कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी दापोलीचे माजी आमदार संजय कदम, छत्रपती संभाजी नगरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगांवकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.