ठाकरे गटाचा मुंबई महापालिकेवर धडक मोर्चा; टीझर केला शेअर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2023 10:16 PM2023-06-25T22:16:05+5:302023-06-25T22:16:29+5:30
मुंबई महापालिकेवर १ जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.
मुंबई- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातर्फे आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महापालिकेवर १ जुलै रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चाचा टीझर शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेत रस्ते कामात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्हिडीओत भ्रष्टाचार कसा झाला आणि किती रक्कमेचा झाला याची माहिती दिली आहे.
हजारो कामं सुरू, कामं होऊ द्या, मुंबई तुंबणार नाही; अजितदादांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला
पुढं या व्हिडीओत मुंबई महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसताना काढण्यात आलेले रस्ता काँक्रिटीकरणासाठी मेगा टेंडर म्हणजे अक्षरशः मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी असल्याचा थेट आरोप ठाकरे गटाकडून राज्य सरकार आणि महानगर पालिकेवर केला आहे. ह्या संदर्भात सविस्तर माहिती देणारा व्हिडीओ सोशल मीडियावर रिलीज केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेक प्रतिक्रियाही येत आहेत.
दरम्यान, आज मुंबईत पावसाला सुरुवात झाली. पहिल्याच पावसात मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचले आहे. यावरुन आरोप -प्रत्यारोप सुरू आहेत. आदित्य ठाकरे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.
शिवसेना भवनात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, 'एकनाथ शिंदेंना लाज वाटली पाहीजे. नालेसफाईची पाहणी मिंधे गट आणि भाजपने केली होती, पण पहिल्याच पावसात मुंबई तुंबली. मुंबईत वेगवेगळ्या रेस्ते कंत्राटांमध्ये घोटाळे झाले आहेत. सत्तेवर गद्दार खोके सरकार आहे. यांनी मोठे घोटाळे केले आहेत, मी अनेक रस्त्यांचे घोटाळे समोर आणले आहेत. सरकारला फक्त कंत्राटदारांची काळजी आहे', असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, 'मुख्यमंत्र्यांनी केलेले विधान निर्लज्जपणाचे, नाकर्तेपणाचे आहे. भ्रष्टाचारचा चेहरा असेल, तर हे खोके सरकार आहे. यापूर्वी कोणत्याच नेत्याने मुंबईकरांना असे उत्तर दिलं नाही, की तक्रार काय करता, याचं स्वागत करा. याचा अर्थ मुख्यमंत्र्यांच्या वाहनांसाठी जेव्हा महामार्गावरील गाड्या थांबवल्या जातील. तेव्हा मुख्यमंत्री बोलतील, ‘तुम्ही गर्दीत अडकलाय, तक्रार काय करता. माझं स्वागत करा.’ एवढा निर्लज्जपणा आणि भ्रष्टाचार मी आतापर्यंत मुंबईत कधीच पाहिला नाही,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
मुंबई महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी नसताना काढण्यात आलेले रस्ता काँक्रिटीकरणासाठी काढलेले मेगा टेंडर म्हणजे अक्षरशः मुंबईकरांच्या पैशांची उधळपट्टी!
काय आहे नेमका रस्ता घोटाळा? pic.twitter.com/ViSDsl6aUu— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) June 25, 2023