मुंबईत लोकसभेच्या चार जागा ठाकरे गट लढवणार; आढावा बैठकीत झाला होता निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 08:29 AM2024-02-22T08:29:48+5:302024-02-22T08:30:43+5:30
२०१९ मध्ये भाजपशी युतीत असताना शिवसेनेने दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या तीन जागांवर लोकसभा निवडणूक लढविली होती.
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत मुंबईतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट चार जागा लढविण्याच्या तयारीत असल्याचे समजते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ‘मातोश्री’ येथे झालेल्या आढावा बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेच्या मुंबईतील सहापैकी चार जागा लढण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
२०१९ मध्ये भाजपशी युतीत असताना शिवसेनेने दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या तीन जागांवर लोकसभा निवडणूक लढविली होती. मात्र, यंदा चार जागांवर उमेदवार देण्याचा ठाकरे गटाचा निश्चय आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबईतून ठाकरे गट उमेदवार उभे करणार असल्याचे समजते.
निवडणूक समन्वयक म्हणून चौघांची नियुक्ती
विलास पोतनीस, दत्ता दळवी, रवींद्र मिर्लेकर, सुधीर साळवी आणि सत्यवान उभे यांची निवडणूक समन्वयक नियुक्ती करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून माजी राज्यसभा खासदार अनिल देसाई आणि उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून उपनेते युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर यांच्या नावावर उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केल्याचे कळते.
ईशान्य मुंबईतून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे माजी खासदार संजय दिना पाटील हे ठाकरे गटाचे उमेदवार असतील, अशी कुजबूज महाविकास आघाडीत आहे.