माहीममध्ये अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? संजय राऊत म्हणाले, "कोणतीही सौदेबाजी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 11:09 AM2024-10-23T11:09:57+5:302024-10-23T11:32:28+5:30

माहीम दादर विधानसभा मतदारसंघातून मनसेने अमित ठाकरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Thackeray group will field candidate against Amit Thackeray from Mahim Dadar assembly constituency | माहीममध्ये अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? संजय राऊत म्हणाले, "कोणतीही सौदेबाजी..."

माहीममध्ये अमित ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? संजय राऊत म्हणाले, "कोणतीही सौदेबाजी..."

Mahim Assembly constituency : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी दुसरी यादी जाहीर केली आहे. मनसे महाराष्ट्रातल्या २८८ पैकी जवळपास २०० ते २२५ जागा लढवणार आहे. मनसेच्या दुसऱ्या यादीत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचेही नाव आहे. अमित ठाकरे हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. माहीम मतदारसंघातून अमित ठाकरे हे निवडणूक लढणार आहे. दुसरीकडे ठाकरे गटानेही या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे ठरवलं आहे. गेल्या निवडणुकीत आदित्य ठाकरेंविरोधात मनसेने उमेदवार दिला नव्हता. मात्र यावेळी पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या अमित ठाकरेंविरोधात ठाकरे गट निवडणूक लढणार आहे.

मनसेने अमित ठाकरे यांना माहीम दादर विधानसभा मतदारासंघातून निवडणुकीसाठी उभं केलं आहे. हा मतदारसंघ पूर्वीपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे. सदा सरवणकर हे विद्यमान आमदार असून शिंदे गटाने यावेळी त्यांनाच उमेदावारी दिली आहे. त्यामुळे सुरुवातीला अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर अशी लढत होणार असं म्हटलं जात होतं. मात्र आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मतदारसंघातून आपणही उमेदवार उभा करणार असल्याचे म्हटलं आहे. शिवसेना पक्ष कोणत्याही प्रकारची सौदेबाजी करत नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

"लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. अनेकदा वर्षोनवर्षे निवडणूक लढवून अनेकांना यश प्राप्त होत नाही. ते पक्ष सुद्धा थांबत नाही म्हणून त्यांनी निवडणूक लढू नये असं आम्ही कधी म्हणणार नाही. अमित ठाकरे निवडणुकीला उभे असतील तर तरुणांचे स्वागत करावे ही आमची परंपरा आणि संस्कृती आहे. दादर मतदारसंघामध्ये शिवसेना कायम लढत आली आहे. दादर माहीम मतदारसंघामध्ये शिवसेनेची स्थापना झाली. जिथे स्थापना झाली त्या मतदारसंघात शिवसेना लढणार नाही असं कधी होत नाही. शिवसेना पक्ष कोणत्याही प्रकारची सौदेबाजी करत नाही. आम्ही निवडणूक लढताना राजकारणात कोणतेही आव्हान आलं तरी ते स्विकारुन उभे असतात", असे संजय राऊत म्हणाले.

वरळीमध्ये मनसेने माघार घेतली तर माहीमध्ये ठाकरे गट उमेदवार देणार का असाही सवाल संजय राऊत यांना विचारण्यात आला. यावर बोलताना राऊत यांनी, "राजकारणामध्ये क्वचित अशा गोष्टी घडत असतात. वरळीमध्ये आदित्य ठाकरे मागच्या इतक्या मताधिक्यानेच निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत. वरळीच्या जनतेने आदित्य ठाकरेंचे काम पाहिलं आहे. आम्हाला वरळीची चिंता नाही, अशी प्रतिक्रिया दिली.

"वरळीतून शिंदे गट ट्रम्पला उभं करणार आहेत का? किंवा नरेंद्र मोदी किंवा जय शाहला आणतील. शिंदेच्या घरामध्ये कोणीही मोठा उमेदवार नाही. या निवडणुकीनंतर ते राज्याचे मुख्यमंत्री नसणार आहेत. त्यांचे मोठेपण निवडणुकीचा निकाल लागेल त्याच दिवशी संपणार आहे. शिंदे गटाच्या उमेदवारांच्या यादीवर अमित शाह यांचा शिक्का आहे," असेही संजय राऊत म्हणाले.
 
 

Web Title: Thackeray group will field candidate against Amit Thackeray from Mahim Dadar assembly constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.