Bageshwar Dhirendra Krishna Statement on Shastri Sai Baba: सातत्याने कोणत्या ना कोणत्या विधानांवरून चर्चेत असलेल्या बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. अलीकडेच लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिर्डीच्या साईबाबांवर केलेल्या विधानाप्रकरणी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याविरोधात मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील वांद्रे पोलिसांत लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. ही तक्रार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवा सेनेने केली आहे. बागेश्वर बाबा यांनी शिर्डीच्या साईबाबांविरोधात केलेले वादग्रस्त वक्तव्यासंदर्भात ही तक्रार दिली आहे. बागेश्वर बाबांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे. बागेश्वर बाबा हे शिर्डी साईबाबांच्या भक्तांच्या भावनांशी खेळत असल्याचे युवासेनेने तक्रारीत म्हटले आहे.
धीरेंद्र शास्त्री यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप
युवासेना नेते आणि शिर्डी साई संस्थानचे माजी विश्वस्त राहुल कानल यांनी तक्रारीत धीरेंद्र शास्त्री यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. तत्पूर्वी, साईबाबा संत आणि फकीर असू शकतात. पण देव असू शकत नाही. आपल्या धर्मात शंकराचार्यांना सर्वात मोठे स्थान आहे. त्यांनी साईबाबांना देवांचे स्थान दिलेले नाही. कोल्ह्याची कातडी पांघरून कोणीही सिंह बनू शकत नाही, असे विधान धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केले होते.
दरम्यान, ज्यांची साईबाबांवर श्रद्धा आहे, त्यांच्या श्रद्धेला मी दुखावू इच्छित नाही. कोणतेही संत असू द्या, मग गोस्वामी तुलसीदास असो, सूरदास असो हे सर्व संत आहेत. काही महापुरुष आहेत. काही युगपुरुष आहेत. काही कल्प पुरुष आहेत. परंतु यात कोणीही देव नाही, असेही बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी म्हटले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"