Join us

विधानभवनातील कार्यालयावर ठाकरे गटाचा हक्क; शिंदे गटासाठी वेगळ्या कार्यालयाची तात्पुरती व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 7:08 AM

सध्या विधिमंडळाच्या लेखी शिवसेना हा एकच पक्ष आहे, शिंदे गटाचे वेगळे अस्तित्व नाही.

- दीपक भातुसेमुंबई : शिवसेना हायजॅक करून शिवसेनेचे तब्बल ४० आमदार आपल्याकडे वळवल्यानंतर एकनाथ शिंदेशिवसेना पक्षावरच दावा करत आहेत. आपण खरी शिवसेना असा दावा शिंदेंबरोबरच त्यांच्याकडे गेलेले आमदारही करत आहेत. या घडामोडीनंतर शिंदे गटाने राज्यातील अनेक शिवसेना शाखांवर आपला हक्कही सांगितला आहे. असे असले तरी विधानभवनातील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गट ताब्यात घेऊ शकलेला नाही. 

विधानभवनात प्रत्येक पक्षाला कार्यालयासाठी जागा दिलेली आहे. तिसऱ्या मजल्यावर शिवसेनेचे कार्यालय आहे. विश्वासदर्शक ठरावावेळी वाद होण्याच्या भीतीने हे कार्यालय बंद ठेवण्यात आले होते. मात्र, आता पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच ठाकरे गटाच्या आमदारांनी शिवसेनेच्या या कार्यालयावर आपला अधिकार कायम ठेवला आहे.

सध्या विधिमंडळाच्या लेखी शिवसेना हा एकच पक्ष आहे, शिंदे गटाचे वेगळे अस्तित्व नाही. त्यामुळे शिंदे गटाला वेगळे कार्यालय देण्यात आलेले नाही. शिवसेनेसाठी ही दिलासादायक आणि जमेची बाजू असल्याची चर्चा आहे. शिवसेनेच्या या कार्यालयात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी आणि प्रतोद सुनील प्रभू यांच्या कॅबिन्स आहेत.

सातव्या मजल्यावर  जागेची व्यवस्था-   

एकनाथ शिंदे शिवसेनेत असताना शिवसेनेच्या याच तिसऱ्या मजल्यावरील कार्यालयात अधिवेशन काळात शिवसेना आमदारांसाठी भोजनाची व्यवस्था करायचे. आता शिंदे गटाकडे विधानभवनात कार्यालय नसल्याने शिंदेंबरोबर असलेल्या आमदारांना बसण्यासाठी, त्यांच्याबरोबरच्या बैठकांसाठी आणि भोजनासाठी जागाच उरली नव्हती. त्यामुळे विधिमंडळाने सातव्या मजल्यावर शिंदे गटासाठी तात्पुरती जागेची व्यवस्था केली आहे. अधिकृतपणे हे कार्यालय विधिमंडळाने शिंदे गटाला दिलेले नाही.

टॅग्स :एकनाथ शिंदेउद्धव ठाकरेशिवसेना