Join us

अंधेरीत ठाकरे गटाची उजळलली मशाल, ऋतुजा लटके दणदणीत मतांनी विजयी

By मनोहर कुंभेजकर | Published: November 06, 2022 3:10 PM

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि शिवसेनेचे पूर्वीचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्या नंतर होणारी आणि महाविकास आघाडीने एकत्र येवून लढवलेली ही पहिलीच ही पोटनिवडणूक होती.अंधेरीत ठाकरे गटाची मशाल उजळली.

मुंबई-शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि शिवसेनेचे पूर्वीचे धनुष्यबाण चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवल्या नंतर होणारी आणि महाविकास आघाडीने एकत्र येवून लढवलेली ही पहिलीच ही पोटनिवडणूक होती.अंधेरीत ठाकरे गटाची मशाल उजळली.

ऋतुजा लटके यांचे पती आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या या मतदार संघात पोटनिवडणूक झाली. भाजपाने या निवडणूकीतून माघार घेतली होती.

 अंधेरी पूर्व मतदारसंघात सुमारे ३१.७४ टक्के मतदान झाले होते. एकूण पडलेल्या ८५४६१ मतांपैकी ऋतुजा रमेश लटके यांना ६५६७८( ७६.७८ टक्के) तर दुसऱ्या क्रमांकावर नोटांना १२७२१ ( १४.८९ टक्के) मते मिळाली. आणि या देशभरात चर्चेचा विषय झालेल्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके या दणदणीत मतांनी विजयी झाल्या.या निवडणुकीत एकूण ७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. तर ६ अपक्ष उमेदवारांचे डीपॉझिट जप्त झाले.

आज सकाळी ७ वाजता अंधेरी पूर्व येथील गुंदवली महापालिका शाळेत मतमोजणीला सुरवात झाली.पहिल्या फेरीपासूनच लटके आघाडीवर होत्या. पहिल्या फेरीअखेर त्यांना ४२७७ मते मिळाली होती. तर दुस-या फेरी अखेर त्यांना ७८१७ मते मिळाली. 

 ऋतुजा लटके आणि आघाडी प्रत्येक फेरी अखेर वाढतच गेली.१४ व्या फेरीत त्यांना ५२,५०७,१५ व्या फेरीत ५५९४६,१६ व्या फेरीत ५८८७५,१७ व्या फेरीत ६१९५६,१८ व्या फेरीत ६५३३५, १९ व्या फेरीत ६६२४७  इतकी  मते मिळाली. पहिल्या फेरी पासून आघाडीवर असलेल्या ऋतुजा लटके विजयी होणार या बातमीने  शिवसैनिकांचा आनंद तर द्विगुणित झाला.

ठाकरे गटाची मशाल उजळल्याने जल्लोष व्यक्त करत अंधेरी पूर्व गुंदवली येथे मतमोजणी केंद्राच्या बाहेर आणि दादरला सेना भवनच्या बाहेर शिवसैनिकांनी आणि महिलांनी मोठी गर्दी केली होती. सेना भवनच्या बाहेर महिलांनी जोरदार घोषणा देवून सारा परिसर दणाणून सोडला होता. ढोल ताशांचा गजर करत आणि गुलाल उधळत शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला.तर वयाच्या ८२ व्या वर्षी मुंबईचे माजी महापौर महादेव देवळे यांनी सेनाभवनच्या बाहेर भन्नाट डान्स करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

भिमेश मुतुला-सामाजिक कार्यकर्ते

२०१९ च्या मागच्या निवडणूक नंतर आजच्या पोटनिवडणुकीत लोकमत अतिशय कमी पडले. अंधेरीत कमीत कमी ६०% मतदान होत होते. आज मात्र ते ३२% वर आले, त्यात नोटा हे दुसऱ्या क्रमांकावर आहे.यात स्पष्ट दिसतय की जे बाकी मत पडले नाहीत ते नाराज झालेल्या भाजपाची मत आहेत आणि बाकी नाराज कार्यकर्त्यांनी आपलं मत नोटाला दिले. ऋतुजा लटके यांचा विजय मुरजी पटेल यांनी फॉर्म मागे घेतल्यानंतर निश्चित झाले होते. मात्र शिवसेना उद्धव ठाकरे गटाला नोटा हे मोठा धक्का आहे. पुढील २०२४ चा निवडणुकीला त्यांना कठीण आव्हान असेल.

टॅग्स :शिवसेनामुंबई