मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ठाकरे सिनेमा रिलीजपूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कारण या सिनेमातील काही संवाद आणि दृश्यांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या बायोपिकमधील दोन दृश्य आणि तीन संवादांवर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, ठाकरे सिनेमाचा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. या सिनेमाची निर्मिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
दरम्यान, सिनेमाच्या ट्रेलर लाँचपूर्वी संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली की, सेन्सॉर बोर्डाच्या आक्षेपानंतरही सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. सामाजिक आणि राजकीय जीवनात बाळासाहेब ठाकरे यांनी 50 वर्षांहून अधिक काळ घालवला आहे. बाळासाहेब ठाकरे जसे होते, त्याप्रमाणेच त्यांना मोठ्या पडद्यावर दर्शवण्यात आले आहे. यावर आक्षेप नोंदवण्याची काहीही गरज नाही.
दरम्यान, ठाकरे सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहे. मराठी आणि हिंदी भाषेत हा सिनेमा रिलीज होणार आहे. दरम्यान, बाळासाहेबांच्या भूमिकेनंतर या सिनेमात सर्वात मोठी भूमिका दत्ता साळवींची आहे. अभिनेता, लेखक प्रवीण तरडे ही महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. संजय राऊत यांनी ठाकरे सिनेमाची पटकथा लिहिली असून यासाठी त्यांना चार वर्षे लागली.
ठाकरे सिनेमातील या संवादांवर आक्षेप
एक संवाद बाबरी मशिदीशी निगडीत आहे. तर दुसरा संवाद हा दक्षिण भारतीयांशी संबंधित आहे. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मुंबईतील दक्षिण भारतीयांवर कडाडून टीका केली होती. दक्षिण भारतीयांमुळे स्थानिक मराठी माणसाचा रोजगार जातो, अशी भूमिका त्यावेळी बाळासाहेबांनी घेतली होती. यावर आधारित सिनेमातील संवादावर सेन्सॉर बोर्डानं हरकत नोंदवली. या संवादात 'यांडू गुंडू' असे शब्द आहेत.