ना नवाजुद्दीनचा, ना सचिन खेडेकरांचा; बाळासाहेबांना 'आवाssज' हवा बाळासाहेबांचाच!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 10:40 AM2018-12-27T10:40:42+5:302018-12-27T10:41:02+5:30
नवाजुद्दीन सिद्दीकी निश्चितच तगडा कलाकार; पण बाळासाहेबांचं उत्तुंग, स्टाइलिश, कणखर, करारी आणि तितकंच हळवं व्यक्तिमत्व साकारणं, हे त्याच्यासाठीही आव्हानच होतं.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे झंझावात. लाखो शिवसैनिकांचं दैवत. सत्तेच्या सिंहासनावर कधीही न बसलेल्या, पण मराठी माणसाच्या मनावर आणि महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवणाऱ्या बाळासाहेबांबद्दल देशभरातील तरुणाईला नेहमीच कुतूहल वाटत आलंय. स्वाभाविकच, बाळासाहेबांचा बायोपिक असलेल्या 'ठाकरे' या सिनेमाबद्दल उत्सुकता आहे. ही उत्सुकता ट्रेलरमुळे आणखी वाढेल, असं वाटत होतं. पण, आपल्या एका 'आवाssजा'वर महाराष्ट्र बंद करू शकणाऱ्या, शिवतीर्थ गाजवणाऱ्या, मराठी माणसाला आधार देणाऱ्या आणि भल्याभल्यांची बोलती बंद करणाऱ्या बाळासाहेबांसाठी सिनेमात वापरला गेलेला आवाज कुणालाच फारसा रुचलेला, पटलेला दिसत नाहीए.
'ठाकरे' सिनेमाचा हिंदी आणि मराठी ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झाला. नवाजुद्दीन सिद्दीकी निश्चितच तगडा कलाकार; पण बाळासाहेबांचं उत्तुंग, स्टाइलिश, कणखर, करारी आणि तितकंच हळवं व्यक्तिमत्व साकारणं, हे त्याच्यासाठीही आव्हानच होतं. मात्र हे त्यानं यशस्वीपणे पेलल्याचं ट्रेलरमधून जाणवतं. सिनेमाचा फोकस, केंद्रबिंदूच बाळासाहेब असल्यानं इतर व्यक्तिरेखांवर निर्माता-दिग्दर्शकानंही फार लक्ष दिलेलं नाही आणि आपलंही जात नाही. पण एक गोष्ट कानांना आणि मनाला सतत खटकत राहते, ती म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचा आवाज.
हिंदी ट्रेलरमध्ये बाळासाहेबांना नवाजुद्दीनचाच आवाज आहे, तर मराठीत तो अभिनेते सचिन खेडेकर यांनी डब केलाय. पण या दोन्ही आवाजांमध्ये बाळासाहेबांच्या खऱ्या आवाजाची उंची, खोली, वजन, दम नसल्याच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत. सचिन खेडेकर यांच्या आवाजातील काही डायलॉग तर 'शिवाजीराजे भोसले बोलतोय' सारखेच वाटतात.
बाळासाहेबांच्या सिनेमात संवाद लेखकाला तसं फारसं काम नव्हतंच. कारण बाळासाहेब असं काही बोलून गेलेत की टाळ्या, शिट्ट्या आणि अंगावर शहारा येतोच. पण, या संवादांना त्यांच्यासारख्याच जबरदस्त आवाजाचीही जोड असायला हवी होती, असं राहून राहून वाटतं. 'बाळकडू' या चित्रपटात, आवाजाचे जादुगार चेतन शशितल यांनी बाळासाहेबांचा हुबेहूब आवाज काढून सगळ्यांना थक्क केलं होतं. त्यामुळे त्यांच्याकडून किंवा त्यांच्यासारख्या एखाद्या डबिंग आर्टिस्टकडून बाळासाहेबांचा आवाज घेता आला असता. त्यामुळे सिनेमातील घटनांना वेगळं वजन आणि वलय प्राप्त झालं असतं, असं अनेकांचं मत आहे. त्यामुळे इथे निर्माता-दिग्दर्शक थोडे चुकलेच, असं म्हणावं लागेल. अर्थात, बाळासाहेबांवरचा सिनेमा पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहे, हे मात्र खरं.