मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट सरकारमध्ये सहभागी झाल्याने आपले मंत्रिपद हुकल्याची भावना शिंदे गटातील आमदारांची झाली आहे. मात्र, याप्रकरणी सहनही होईना आणि सांगताही येईना, अशी अवस्था या मंत्र्यांची आहे. शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिवसेनेचे ४० आणि १० अपक्ष आमदार सरकारमध्ये सहभागी झाले. यात शिंदेसह दहा जणांना मंत्रिपदाची संधी मिळाली. याचदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भावी मुख्यमंत्री अशा फलकाची देखील चर्चा रंगली आहे.
आज अजित पवार यांचा वाढदिवस आहे. याचपार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ठिकाणी 'भावी मुख्यमंत्री अजित पवार', असे फलक झळकवण्यात आले आहे. त्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज मोठा दावा केला आहे. दोन्ही उपमुख्यमंत्री मिळून मुख्यमंत्र्यांचा करेक्ट कार्यक्रम करतील, असं विधान संजय राऊत यांनी आज केलं आहे. हे सगळं ठरल्याप्रमाणे स्क्रिप्टने होईल. आगामी काळात अजित पवार मुख्यमंत्री बनणार आहे. हे मी आधी देखील सांगितलं आहे, असं संजय राऊत यावेळी म्हणाले.
बंड करताना यातील अनेक आमदारांना शिंदे यांच्याकडून तसेच भाजपकडून मंत्रिपदाचे आश्वासन देण्यात आले होते. ते पूर्ण न झाल्याने त्यांच्यातील नाराजी डोके वर काढत आहे. मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात शिंदेंबरोबरच्या ज्येष्ठ नेत्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली, यातील अनेकजण महाविकास आघाडीच्या काळात मंत्री होते. पहिला विस्तार झाला तेव्हा लवकरच दुसरा विस्तार करून इतरांना मंत्रिपदाची संधी दिली जाईल, असे सांगितले गेले. मात्र, वर्षभर विस्तार रखडला. विस्ताराची चर्चा सुरू असतानाच अजित पवार गटाचा प्रवेश झाला. फुटलेल्या राष्ट्रवादीच्या नऊ जणांना मंत्रिपदे मिळाली.
शिंदे गटातील मंत्र्यांनाही फटका
एकीकडे शिंदे गटातील आमदारांना मंत्रिपदाची संधी न मिळाल्याने नाराज आहेत. दुसरीकडे अजित पवार गटातील मंत्र्यांसाठी शिंदे गटातील काही मंत्र्यांना आपल्याकडील खात्यांचा त्याग करावा लागला. अब्दुल सत्तार यांना कृषी खाते सोडावे लागले, तर संजय राठोड यांना अन्न व औषध प्रशासन विभाग सोडावा लागला. तसेच, शिंदे गटाकडे असलेले मदत व पुनर्वसन आणि बंदरे ही खातीही अजित पवार गटाला देण्यात आली.
विस्ताराची केवळ प्रतीक्षाच
शिंदे गटातील भरत गोगावले, संजय शिरसाट मंत्रिमंडळ विस्तार होणार, आपल्याला संधी मिळणार, असे जाहीरपणे बोलत होते. मात्र, अधिवेशन सुरू झाले तरी, विस्तार न झाल्याने आता शिंदे गटातील आमदारांनी विस्ताराची आशाच सोडली आहे.