ठाकरे-शिंदे संघर्ष, दसरा मेळावा शिवतीर्थावरच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 09:38 AM2022-09-14T09:38:35+5:302022-09-14T09:39:09+5:30

दसरा मेळावा शिवसेनाच घेईल आणि तो शिवतीर्थावरच असेल असं विधान आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानं याच मैदानावरून ठाकरे-शिंदे गटात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. 

Thackeray-Shinde conflict, Dussehra melava at Shivtirth! Signals of CM Eknath Shinde | ठाकरे-शिंदे संघर्ष, दसरा मेळावा शिवतीर्थावरच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत

ठाकरे-शिंदे संघर्ष, दसरा मेळावा शिवतीर्थावरच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे संकेत

googlenewsNext

मुंबई - गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेची परंपरा असलेला दसरा मेळावा यंदा कोण घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दरवर्षी दसऱ्याला दादर येथील शिवाजी पार्कमध्ये मेळावा आयोजित करतात. या मेळाव्याची सर्व शिवसैनिकांना प्रचंड उत्सुकता असते. मात्र यंदाच्या दसरा मेळाव्यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संघर्ष पेटला आहे. 

शिंदे गटाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळावा शिवतीर्थावरच होईल असे संकेत दिले आहेत. त्यामुळे शिवाजी पार्कवरील मेळाव्याला कुणाची परवानगी मिळते हे पाहणे गरजेचे आहे. शिवाजी पार्कवर मेळावा आयोजित करण्यासाठी उद्धव ठाकरे गटाकडून पहिला अर्ज प्राप्त झाला होता. अनिल परब यांनी हा अर्ज दिला. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क उपलब्ध करून द्यावा असा अर्ज केला. परंतु गणेशोत्सवाचं कारण देत महापालिकेने यावर निर्णय घेतला नव्हता. मात्र आता महापालिकेला या दोन्ही अर्जावर निकाल द्यावा लागणार आहे. 

सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटालाच हे मैदान उपलब्ध होईल असं सांगितले जात होते. परंतु शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी शिवतीर्थासोबतच अन्य एका जागेवर आम्ही अर्ज केला आहे अशी माहिती दिली होती. मात्र दसरा मेळावा शिवसेनाच घेईल आणि तो शिवतीर्थावरच असेल असं विधान आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केल्यानं याच मैदानावरून ठाकरे-शिंदे गटात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. 

काय म्हणाले शंभुराज देसाई? 
नेहमीप्रमाणे शिवसेनेच्या नेते, उपनेते, पदाधिकाऱ्यांची बैठक होती. पक्षसंघटना विस्तार करण्याबाबत नियोजन करण्याबाबत चर्चा झाली. अतिशय उत्साहाचं वातावरण आमच्या पक्षात आहे. प्रत्येक नेते, मंत्री जिल्हाजिल्ह्यात फिरणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आग्रह धरत खरे हिंदुत्ववादी विचारांचे सोने लुटायचे. यासाठी आपलाच मेळावा शिवतीर्थावर झाला पाहिजे. आमदारांनी हा आग्रह मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे धरला होता. त्यावर त्यांनी सकारात्मक भूमिका मांडली असं शंभुराज देसाई यांनी सांगितले. त्याचसोबत केवळ गैरसमजाच्या वावड्या उठवायच्या. बाळासाहेब ठाकरेंचे विचार ज्यांनी बाजूला ठेवले ते आमच्यावर बोलतायेत. कधीही शिवसेनेला काँग्रेससोबत जाऊ देणार नाही असं बाळासाहेब ठाकरे म्हटले होते. आमच्या ५० आमदारांमध्ये एकमत, एकवाक्यता आहे. त्यामुळे आमच्यात खदखद आहे हे बोलण्यापेक्षा जे तुमच्याकडे आहेत त्यातील अनेकजण आमच्या संपर्कात आहेत असंही शंभुराज देसाईंनी सांगितले. 

उद्धव ठाकरे गटाचा आरोप
तर ज्याप्रकारे सरकारचा कारभार सुरू आहे त्यावर जनता नाराज आहे. ४० आमदारांबाबत नाराजी उपमुख्यमंत्री व्यक्त करतात. लोकप्रतिनिधी धमकावण्याची भाषा करतात. त्यांना समज देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली असावी. आपापसतले मतभेद समोर येत आहेत. त्यासाठी ही बैठक आयोजित केली होती. लम्पी आजारामुळे पशुधनाचं नुकसान होत आहे त्याकडे सरकारचं लक्ष नाही असा आरोप विधान परिषदेच्या सदस्या मनिषा कायंदे यांनी सांगितले.  

Web Title: Thackeray-Shinde conflict, Dussehra melava at Shivtirth! Signals of CM Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.