मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन केले. मात्र, यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गटातील कार्यकर्ते आमने-सामने आल्याने जोरदार घोषणा झाल्या व वातावरण तणावग्रस्त झाले. शिवाजी पार्क पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना स्मृतिस्थळाहून बाहेर काढल्यानंतर वाद निवळला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शुक्रवारी स्मृतिदिन असून यानिमित्त स्मृतिस्थळावर तयारी करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी आदल्या दिवशी गुरुवारी सायंकाळी ९ वाजण्याच्या सुमारास स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी तिथे उपस्थित ठाकरे व शिंदे गटाचे कार्यकर्ते समोरासमोर आल्याने जोरदार घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री स्मृतिस्थळाहून बाहेर पडल्यानंतर दाेन्ही गट एकमेकांच्या अंगावर जाण्याची परिस्थिती दिसताच पोलिसांनी कार्यकर्त्यांना आवरले. ठाकरे गटाकडून ‘गद्दार...गद्दार’ अशा घोषणा देण्यात आल्या तर ‘एकनाथ शिंदे अंगार है, बाकी सब भंगार है’ अशा घोषणा शिंदे गटाकडून देण्यात येत होत्या.
बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला मी माझ्याकडून व आमच्या समस्त शिवसेना पक्षाकडून त्यांना नम्रपणे आदरांजली वाहिली. बाळासाहेबांचे स्वप्न होते की, अयोध्येत राममंदिर उभे राहावे आणि ते राम मंदिर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने उभे राहिले आहे आणि त्याचे लोकार्पण २२ जानेवारीला होणार आहे. २३ जानेवारीला बाळासाहेबांचा जन्मदिन असतो. त्याच्या आदल्या दिवशीच आम्ही सर्व सामान्य जनतेसाठी राममंदिर खुले करीत आहोत. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री