चकाचक रस्त्यांसाठी ठाणेकर वेटिंगवर
By admin | Published: July 3, 2014 02:33 AM2014-07-03T02:33:55+5:302014-07-03T02:33:55+5:30
ठाण्यातही मेट्रो धावणार असल्याची जाहिरात होते आहे. लवकरच ठाणेकरांना उत्तम सोयीसुविधा मिळतील अशा प्रतीक्षेत असणाऱ्या ठाणेकरांना चकाचक रस्त्यासाठी मात्र, आणखी तीन वर्षे वाट पहावी लागणार आहे.
ठाणे : ठाण्यातही मेट्रो धावणार असल्याची जाहिरात होते आहे. लवकरच ठाणेकरांना उत्तम सोयीसुविधा मिळतील अशा प्रतीक्षेत असणाऱ्या ठाणेकरांना चकाचक रस्त्यासाठी मात्र, आणखी तीन वर्षे वाट पहावी लागणार आहे.
रस्त्यांवर पडणाऱ्या खड्ड्यांपासून ठाणेकरांची कायमस्वरूपी मुक्तता व्हावी, या उद्देशाने ठाणे महापालिकेने नऊ प्रभाग समिती अंतर्गत नव्याने रस्ते तयार करण्याचा जम्बो प्लान तयार केला आहे. महापालिकेची तिजोरी रिती झाल्याने रस्त्यांच्या जम्बो प्लॅनसाठी एकही निविदाकार पुढे येत नव्हता. त्यामुळे शहरातील २९५ रस्त्यांची तब्बल १०४.७९४ किमीची कामे कागदावरच राहिली. चारदा मुदतवाढ मिळूनही याला प्रतिसाद मिळाला नव्हता. आता मात्र, तीन टप्प्यांतील कामांसाठी १० निविदाकार पुढे आले आहेत. डिफर्ड पेमेंट अटीबरोबरच पहिल्यांदाच या निविदाकारांना महापालिकेच्या क्वॉलिटी अॅण्ड कॉस्ट बेस सिलेक्शनच्या परीक्षेत उत्तीर्ण व्हावे लागणार आहे. त्यामुळे किती ठेकेदार या परीक्षेत पास होतात, त्यावर या प्रकल्पाचे भवितव्य ठरणार आहे.
सध्या पालिकेला ठेकेदारांचे ४५ कोटी देणे असून एलबीटीमधून अद्यापही पालिका सावरलेली नाही. या रस्त्यांच्या कामांची देणी पालिका डिफर्ड पेमेंटने देणार आहे. परंतु, पालिकेची सध्याची स्थिती पाहता ठेकेदार या कामांसाठी पुढे येत नसल्याचे चित्र मागील महिन्यापर्यत दिसून येत होते. विशेष म्हणजे निविदाकार मिळावेत, यासाठी चार वेळा मुदतवाढ देण्यात आली.
रस्त्यांच्या बांधकामासाठी ९३९.२० कोटी आणि देखभाल दुरुस्तीसाठी ३१.१५ असा मिळून एकूण ९७०.३५ कोटींचा खर्च महापालिका या रस्त्यांसाठी करणार आहे. विशेष म्हणजे या रस्त्यांकामी वरिष्ठ विधी सल्लागार व अनुभवी चार्टर्ड अकाउंटंटचीही नियुक्ती करण्यात होणार असून यासाठी ५६.१८ लाखांची तरतूद केली जाणार आहे.
महापालिकेने -
१) कोपरी, नौपाडा आणि उथळसर भागांतील रस्त्यांच्या कामासाठी १८२ कोटी
२) वागळे, रायलादेवी, वर्तकनगरसाठी २२७ आणि
३) मानपाडा, कळवा आणि मुंब्य्रासाठी १८६ कोटी या प्रकारे निविदा काढल्या आहेत. त्यानुसार, पहिल्या कामासाठी ३, दुसऱ्या टप्प्यासाठी ४ आणि तिसऱ्या टप्प्यासाठी ३ अशा प्रकारे निविदा मिळाल्या असून पहिल्या आणि तिसऱ्या टप्प्यातील निविदांची छाननी सुरू झाली असून येत्या काही दिवसांत निविदाकार निश्चित होतील, असे पालिकेने स्पष्ट केले.
काम करणाऱ्या ठेकेदाराला पूर्वानुभवावर म्हणजे क्यूसीबीएस पद्धतीची परीक्षा पास व्हावे लागणार आहे. यामध्ये आधीच्या कामांसाठी ७० आणि कमी खर्चात काम करून देण्यासाठी ३० गुण अशा १०० गुणांची परीक्षा त्यांना द्यावी लागणार आहे. (प्रतिनिधी)