लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील सरकार हे दिल्लीचे असून दुर्दैवाने महाराष्ट्राचेदेखील आहे. काम‘गार’ करणारे हे सरकार आहे. राज्याचे काय होणार? मुख्यमंत्री असताना मला जे करता आले ते मी केले. परंतु ज्या पद्धतीने पाठीत खंजीर खुपसून सरकार पाडले, त्याचा बदला मी घेणारच, जन्मभर लक्षात राहील अशी अद्दल घडवणार, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी शिंदे गटाला गुरुवारी दिला. जोडे पुसायची लायकी असणारे सरकार चालवताहेत, असे टीकास्त्रही त्यांनी सोडले.
भारतीय कामगार सेनेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना ठाकरे म्हणाले, शिवसेनेला ५६ वर्षे झाली, भारतीय कामगार सेनेला ५५ वर्षे झाली तरीही ती अजून तरुण आहे. त्या काळी युनियन तुझी का माझी यावरून मारामारी होत असे. आता सरकारच युनियन संपवायला निघाले आहे. प्रत्येकाचे दिवस असतात. आपले दिवस गेलेत असे म्हणूच शकत नाही. ते आणायचेत.
सामान्य माणसे मतदानातून जोडे मारतील - एकनाथ शिंदेमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करीत उद्धव ठाकरे यांना सडेतोड उत्तर दिले आहे. जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा जास्त प्रामाणिक असतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात. हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे, असे त्यांनी म्हटले आहे.