मुंबई : केईएम रुग्णालयातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा विभागाच्या उद्घाटनासाठी आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी डेंग्यूचा धोका लक्षात घेऊन शिवसेना युनियनमधील कर्मचाऱ्यांनी सुट्या घेऊ नका, रुग्णांचे हाल होऊ देऊ नका. अन्यथा इतर युनियन आणि आपल्यात फरक काय, असा सल्ला युनियनच्या कार्यकर्त्यांना दिला होता. त्यानंतर लगेचच दुसऱ्याच दिवशी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या कर्मचाऱ्यांनी केईएममध्ये ठिय्या आंदोलन केल्यामुळे एक्स-रे काढण्यासाठी आलेल्या रुग्णांचे आज केईएम रुग्णालयात दिवसभर हाल झाले. केईएमच्या रेडिओलॉजी विभागामध्ये ७१ कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र यापैकी एक्स-रे विभागात काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांनी आज ठिय्या आंदोलन केले. पदोन्नतीच्या प्रश्नावरून हे आंदोलन केल्याचे युनियनकडून सांगण्यात आले. मात्र, याचा मोठा फटका रुग्णांना बसला. दर दिवशी रुग्णालयात सुमारे २०० ते २२५ एक्स-रे काढले जातात. आज एक्स-रे विभागात अवघे दोन ते तीन कर्मचारीच कार्यरत असल्यामुळे रुग्णांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागले. कदाचित उद्याही कर्मचारी असेच ठिय्या आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.रेडिओलॉजी विभागामध्ये ५ कर्मचाऱ्यांनाच पदोन्नती देण्याचा प्रयत्न रुग्णालय प्रशासनाकडून होत असल्याचा आरोप या कर्मचारी संघटनेने केला आहे. उर्वरित कर्मचारी वरिष्ठ असूनही त्यांना तीन वर्षांपासून पदोन्नती दिलेली नाही. आठ वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना साहाय्यक तंत्रज्ञ म्हणून पगार दिला जातो. मात्र, त्यांच्याकडून तंत्रज्ञाचे काम करून घेतले जात आहे. आमचा वाद हा तात्त्विक असून अन्यायाविरुद्ध आम्ही आंदोलन केल्याचे युनियनचे कार्यकारी अध्यक्ष सुनील चिटणीस यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
ठाकरेंच्या आवाहनाला घरचाच अहेर !
By admin | Published: November 20, 2014 12:50 AM