मुंबई :
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुखपदाची मुदत बाळासाहेबांच्या जयंतीला २३ जानेवारी रोजी संपत आहे. मुदत वाढवून देण्यासाठी तसेच पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया राबविण्याबाबत निवडणूक आयोगाकडे केलेल्या अर्जावर कोणताच निर्णय न झाल्याने ठाकरे गटासमोर पेच निर्माण झाला आहे. पुढचे पाऊल काय टाकायचे, याबाबत खलबते सुरू झाली आहेत.
शिवसेनेच्या घटनेनुसार २०१८ साली झालेल्या पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रियेनुसार ठाकरे यांच्याकडे एकमताने पक्षप्रमुखपद देण्यात आले होते. मात्र, आता शिवसेनेतच फूट पडल्याने शिवसेना आणि निवडणूक चिन्ह कुणाचे, असा वाद निवडणूक आयोगासमोर सुरू झाला आहे. आयोगाने दोन्ही पक्षांना आपली बाजू ३० जानेवारीपर्यंत लेखी स्वरूपात मांडण्यास सांगितले आहे. त्याआधीच पक्षप्रमुखपदाची मुदत संपत असल्याने त्यानंतर तांत्रिकदृष्ट्या उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख राहणार की नाहीत, असा पेच निर्माण झाला आहे.
शिंदे गटाचा दावाशिवसेनेचे विधानसभेतील आमदार, लोकसभेचे खासदार मोठ्या संख्येने आमच्यासोबत आहेत. त्यामुळे आमचीच शिवसेना खरी असून, पक्षाच्या कार्यकारिणीनेच मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे 'प्रमुख नेते' हे पद दिल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. ठाकरे यांचा सस्पेन्स २३ जानेवारीलाच विधानभवनात शिवसेनाप्रमुखांच्या तैलचित्राचे अनावरण होणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांना निमंत्रण पाठविण्यात आले आहे. ठाकरे उपस्थित राहणार की नाहीत, याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे.पक्षप्रमुख पक्षच ठरवणार : ठाकरे गटउद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख आहेत आणि पक्षप्रमुख कोण हे ठरवण्याचा अधिकार पक्षाचाच आहे, असे वक्तव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्याचप्रमाणे पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी आणि नेत्यांसाठी उद्धव ठाकरे हेच शिवसेना पक्षाचे प्रमुख आहेत आणि राहतील, कायदेशीर औपचारिकता म्हणून आयोगाकडे परवानगी मागितल्याचे सचिव अनिल परब यांनी सांगितले.