वादळी वाऱ्यासह थैमान, कोकणालाही झोडपले; वृक्ष उन्मळून पडले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 06:08 AM2020-08-06T06:08:29+5:302020-08-06T06:09:39+5:30
मुंबई, ठाण्यात लाखो लोकांचे हाल : हजारो वाहने अडकली; वीज, मोबाइलचे टॉवर उखडले
मुंबई : मुंबई, नवी मुंबईसह ठाणे, पालघर आणि कोकणाला बुधवारी वादळी पावसाने अक्षरक्ष: झोडपून काढले. धडकी भरवणाºया सोसाट्याच्या वाºयामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पडझडीच्या दुर्घटना घडल्या. मोठ्या संख्येने वृक्ष उन्मळून पडले. अनेकांना २६ जुलैच्या पावसाची आठवण झाली. बुधवारी मुंबईत ३२८.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. आॅगस्टमधील ४६ वर्षांतील हा सर्वाधिक पाऊस आहे.
सखल भागात ठिकठिकाणी पाणी साठल्याने रस्ते वाहतुकीला ब्रेक लागला होता. तर कोकणातील बहुतांश नद्यांना पूर आला असून अनेक गावांना पुराच्या पाण्याचा विळखा बसला आहे. मुंबई-गोवा महामार्ग बंद झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही अतिवृष्टी झाली असून पंचगंगेने धोक्याची पातळी (पान २ वर)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला असून, मुंबई महापालिकेला सतर्कराहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
लोकलमध्ये अडकलेल्या २९० प्रवाशांची बोटीतून सुटका
कोरोनामुळे मुंबईत सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच लोकल सुरू आहेत. मात्र, बुधवारी मुसळधार पावसामुळे या सेवेलाही ब्रेक लागला. सीएसएमटीवरून कर्जतला जाणाºया दोन लोकल मशीद बंदर आणि भायखळा स्थानकांदरम्यान पाणी साचल्याने अडकल्या होत्या. यातील सुमारे २९० प्रवाशांची एनडीआरएफच्या जवानांनी बोटीतून सुखरूप सुटका केली.
98नंतरचामोठा पाऊस
कुलाबा येथे ५ आॅगस्ट रोजी नोंदविलेला ३२८.८ मिलीमीटर पाऊस हा गेल्या ४६ वर्षांतील आॅगस्टमधील सर्वाधिक पाऊस आहे. १० आॅगस्ट १९९८ रोजी येथे २६१.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती.
ठाण्यात जनजीवन विस्कळीत
ठाणे : मुसळधार पावसामुळे बुधवारी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले. मीरा-भार्इंदर परिसरातही पावसाने धुमाकूळ घातला. काशिमीरा भागातील ४७ वर्षीय राकेश धीरूभाई हरसोरा हे वाहून जाणारी दुचाकी पकडण्याच्या प्रयत्नात नाल्यात बुडाले. ठाण्यात झाडांची मोठी पडझड झाली.