ठाकरेंची 'तेजस एक्स्प्रेस' सुसाट; उद्धवपुत्राने धरली राजकारणाहून वेगळीच वाट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2018 01:14 PM2018-07-24T13:14:39+5:302018-07-24T13:17:08+5:30
उद्धव ठाकरेंच्या मोठ्या मुलाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे राजकारणात सक्रीय झाले आहेत. मात्र, उद्धव यांचे दुसरे चिरंजीव तेजस यांना..
मुंबई - उद्धव ठाकरेंच्या मोठ्या मुलाबद्दल सर्वांनाच माहिती आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे राजकारणात सक्रीय झाले आहेत. मात्र, उद्धव यांचे दुसरे चिरंजीव तेजस यांना निसर्ग आणि पर्यावरणाचा छंद आहे. प्राणी आणि पक्ष्यांमध्ये रमायला तेजस यांना आवडते. तेजस यांच्या या हटके आवडीबद्दल उद्धव ठाकरेंनी समाधान व्यक्त केले असून तेजसने वेगळी वाट पकडल्याचे सांगताना त्याचे कौतूकही केले आहे.
आदित्यने राजकारणात स्वत:च स्थान निर्माण केलयं, तो सध्या महाराष्ट्रभर फिरतोय. मात्र, तेजस त्याच्या मार्गाने चाललाय, निसर्ग आणि पर्यावरण यामध्ये तो नवनवीन प्रयोग करतोय. नवीन प्राणी, पक्षी यांचा शोध घेतोय. आज त्याच्या शोधाला जगन्मान्यता मिळतेय. मग, हीदेखील घराणेशाहीच का? असा उपरोधात्मक सवालही उद्धव यांनी विचारला. तेजसने खेकड्यांची नवीन जात शोधली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनाही पशु-पक्ष्यांची आवड होती, त्यामुळे तेजसचा हा छंदही एकप्रकारे घराणेशाहीच असल्याचे मी म्हणेन. तेजसने निवडलेला मार्ग अतिशय वेगळा आहे. त्याला पशु-पक्ष्यांसोबतच झाडं, पान, फूल, दगड, शंख, शिंपले यांची शास्त्रीय नावे माहित आहेत. दगडांच एक वेगळ जगं आहे, त्यात तेजस रमतो. उत्तम काम करतो, तो खूप खोलात जाऊन अभ्यास करतो, असेही उद्धव ठाकरेंनी आपल्या दुसऱ्या चिरंजीवांबद्दल सांगितले.
उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य यांनी राजकारणात सक्रीय सहभाग घेतला. त्यानंतर, ही घराणेशाही नाही का? असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. त्यावर, बाळासाहेबांनीही एका मुलाखतीत राजकारण हा आदित्यने निवडलेला मार्ग असल्याचे सांगितले होते. तर, आता तेजसही पशु-पक्षी, पर्यावरण आणि निसर्ग या विषयात रमत आहे. त्यामुळे तेजसला हाही वारसा घराणेशाहीतून मिळाल्याचे उद्धव यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मात्र, तेजस राजकारणात येणार का नाही याबाबत कुठलीही चर्चा या मुलाखतीमध्ये करण्यात आली नाही.