संपाबाबत बेस्ट समितीची सभा तहकुबी शिवसेनेने फेटाळली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 05:03 AM2019-01-22T05:03:33+5:302019-01-22T05:03:45+5:30
बेस्ट कामगारांच्या संप काळात नाचक्की झाल्यानंतर अद्याप आपली बाजू सावरण्याची हिंमत शिवसेनेत आलेली नाही.
मुंबई : बेस्ट कामगारांच्या संप काळात नाचक्की झाल्यानंतर अद्याप आपली बाजू सावरण्याची हिंमत शिवसेनेत आलेली नाही. कामगारांचे प्रश्न व संप हाताळण्यात अपयशी ठरलेल्या बेस्ट प्रशासनाच्या निषेधार्थ बेस्ट समितीची बैठक तहकूब करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली होती. मात्र विरोधक आणखी कोंडी करतील, या विचारानेच धास्तावलेल्या सत्ताधाऱ्यांनी सभा तहकुबी होऊ दिली नाही.
सुधारित वेतन, बोनस, कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न आदी मागण्यांसाठी बेस्ट कामगार संघटनांनी ७ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून बेमुदत संप पुकारला होता. तब्बल नऊ दिवस चाललेला हा संप मुंबई उच्च न्यायालयाच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आला होता. संपात आधी सहभागी झाल्यानंतर २४ तासांनी माघार घेऊन शिवसेनेने स्वपक्षीय संघटनेतील बेस्ट कामगारांचाही रोष ओढावून घेतला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतरही कामगार संघटनांबरोबर चर्चा फिसकटली. कामगार संघटनांनी अनेक आरोप केल्यानंतरही शिवसेनेला आपली बाजू मांडता आली नव्हती.
ही संधी बेस्ट समितीच्या बैठकीत विरोधी पक्षांनीच सोमवारी उपलब्ध करून दिली होती. विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी महाव्यवस्थापकांच्या कारभाराच्या निषेधार्थ सभा तहकुबी मांडली होती. यामध्ये बेस्ट समिती सदस्यांना विश्वासात न घेता काम करणे, आपल्या मर्जीप्रमाणे महाव्यवस्थापक काम करीत असल्याने त्यांच्या निष्क्रियतेचा व उदासीनवृत्तीचा निषेध करण्यात येत असल्याचे त्यांनी निवेदन केले. मात्र त्यांच्या सभा तहकुबीला सर्वच पक्षांचे समर्थन असताना शिवसेनेने मतदान घेत विरोधकांची मागणी फेटाळली.
>संप काळात १९ कोटींचे नुकसान
बेस्ट उपक्रमातून दररोज सुमारे २५ लाख प्रवासी प्रवास करतात. बसभाड्यातून बेस्ट उपक्रमाला तीन कोटी रुपये उत्पन्न मिळते. मात्र संप काळात संपूर्ण आठ दिवस एकही बस आगाराबाहेर पडली नाही. यामुळे बेस्ट उपक्रमाचा महसूल बुडाला. संपाच्या नवव्या दिवशी दुपारी ४ वाजता कामगार संघटनांनी संप मागे घेतला. त्यानंतर पहिली बस आगाराबाहेर पडली. दुपारनंतर बेस्ट उपक्रमाच्या केवळ ८९३ बसगाड्या रस्त्यावर धावल्या. त्याद्वारे तिकिटांच्या माध्यमातून २६ लाख पाच हजार रुपये उत्पन्न बेस्टच्या तिजोरीत जमा झाले. तर १९ कोटी ८८ लाख रुपयांचा महसूल बुडाला. तर १० बसगाड्यांच्या काचा फोडण्यात आल्यामुळे त्यांच्या दुरुस्तीवर ३७ हजार रुपये खर्च करण्यात आले.