मुंबई : राज्य शासनाचा कौशल्य विकास प्रशिक्षण निधी लाटण्यासाठी बीडमध्ये कंत्राटीअधिकाऱ्याला हाताशी धरून १० बोगस प्रशिक्षण संस्था थाटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानुसार, संबंधित संस्थांविरुद्ध महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबईचे संतोष राऊत (३८) यांच्या तक्रारीवरून सोमवारी आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी ही जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विकास केंद्रांमार्फत शासनाच्या सर्व कौशल्य विकास योजना पार पाडत असते. या सर्व कामात महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी तसेच महाराष्ट्रातील सर्व जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विकास केंदे्र ही ‘महास्वयम्’ या शासकीय पोर्टलवरून जोडण्यात आली आहेत.
सदरचे पोर्टल हे ‘सिल्वर टच’ या संस्थेद्वारे बनविण्यात आले असून त्याचे समायोजनदेखील त्यांच्याकडून करण्यात येते. या पोर्टलद्वारे सदर योजनांचा लाभ घेणाºया सर्व खासगी तसेच शासकीय संस्था या नोंदणी करीत असतात. नोंदणी झाल्यानंतर अधिकृत संस्थांना शासनाकडून प्रशिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांसाठी १५ हजार रुपयांचा निधी दिला जातो. हाच निधी लाटण्यासाठी बीडमधील १० संस्थांनी पोर्टलच्या कंत्राटदारास हाताशी धरून बनावट केंद्रे उघडली.
३१ आॅक्टोबर रोजी राऊत यांच्याकडे अशा संस्थांच्या तपासणीबाबत सांगण्यात आले. त्यानुसार, त्यांनी १८, १९ आॅक्टोबर रोजी बीड शहर, माजलगाव व परळी येथे जात तपासणी सुरू केली. संबंधित पत्त्यांवर विकास प्रशिक्षण संस्था अस्तित्वातच नसल्याचे समोर आले. यात बीडमधील ग्लोबल अॅकॅडमी, विद्यासागर, सहयोग स्कील, अभिनंदन कॉम्प्युटर्स, नमनल स्कील अॅकॅडमी, प्रतिभा, यश स्कील, गॅलेक्सी, अचिवर्स, अॅपेक्स संस्थांचा समावेश आहे.
शासकीय संकेतस्थळावरूनच त्यांना मान्यता देण्यात आल्याचे समोर येताच, संकेतस्थळाची जबाबदारी सोपविलेल्या ‘सिल्वर टच’कडे चौकशी केली. त्यातून, ४ नोव्हेंबर २०१८ रोजी हा व्यवहार केल्याचे समोर आले. सुटीच्या दिवशीच कंत्राटी कौशल्य विकास अधिकारी २ तौसीफ शेख यांच्या लॉगईन आयडीचा वापर करून या संस्थांना मान्यता दिल्याचे ‘सिल्वर टच’कडून सांगण्यात आले. याबाबतचा अहवाल कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या अपरमुख्य सचिवांकडे पाठविण्यात आला. त्यानुसार, चौकशीअंती त्यांच्या आदेशाने अखेर, राऊत यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दिली.
पोलिसांकडून अधिक तपास सुरू
आझाद मैदान पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे. संबंधित संस्थांनी आतापर्यंत किती निधी लाटला? यात कुणा-कुणाचा समावेश आहे? आदींबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे आझाद मैदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) रमेश यादव यांनी सांगितले.