शाळा-महाविद्यालयांसमोर आज थाळीनाद, संपाचा सातवा दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 09:48 AM2023-03-20T09:48:14+5:302023-03-20T09:48:26+5:30
आंदोलन आणि थाळीनादाचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक मुकुंद आंधळकर यांनी दिली.
मुंबई : जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी संपावर गेलेल्या १६ लाख कर्मचाऱ्यांमध्ये जवळपास साडेतीन ते चार लाख शिक्षकांचा समावेश आहे. आज, सोमवारी संपावर असलेले सर्व शिक्षक राज्यभरातील निरीक्षक कार्यालये, शिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करणार असून शाळा-महाविद्यालयांसमोर दुपारी १२ ते १२.३० या कालावधीत थाळीनाद करणार आहेत.
सर्व शिक्षक संपावर गेल्यामुळे शालेय कामकाजाचे अनेक ठिकाणी तीन तेरा वाजले असून शालेय अध्यापन, परीक्षा व दहावी बारावीच्या उत्तरपत्रिका तपासण्याचे काम थांबले आहे. याचा फटका विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा, मूल्यमापन, निकालांना बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
आंदोलन आणि थाळीनादाचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे समन्वयक मुकुंद आंधळकर यांनी दिली. मात्र ज्या शाळेत त्या वेळेत दहावीची बोर्डाची परीक्षा असेल तेथे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षेच्या वेळेत थाळीनाद न करता आपल्या सोयीनुसार व वेळेच्या उपलब्धतेनुसार थाळीनाद आंदोलन करावे, असेही समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
वार्षिक परीक्षांना फटका बसण्याची भीती
राज्य शिक्षक परिषदेच्या झालेल्या ५० प्रतिनिधींच्या बैठकीत हा संप अधिक तीव्र करण्यात येणार असून येत्या काळातील परीक्षांवर बहिष्कारही टाकला जाऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू ठेवून आतापर्यंत दहावीच्या परीक्षांना सहकार्य करण्यात आले असले तरी यापुढे इतर वर्गांच्या वार्षिक परीक्षा, त्यांचे निकाल, दहावीच्या उत्तरपत्रिका तपासणी यांवरच बहिष्कार अधिक तीव्र होईल, असा इशारा राज्य शिक्षक परिषदेचे मुंबई कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी दिला आहे.