मुंबई : ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांची कायद्यानुसार ठामपा आयुक्त म्हणून तीन वर्षांची कारकिर्द पूर्ण झाल्याने त्यांची बदली करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना द्यावा, अशी विनंती करणारी याचिका ठाण्याचे सामाजिक कार्यकर्ते विक्रांत कर्णिक यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.महाराष्ट्र सरकारी कर्मचारी संदर्भात असलेला ‘रेग्युलेशन आॅफ ट्रान्सफर अॅण्ड प्रिव्हेन्शन आॅफ डिले इन डिस्चार्ज आॅफ आॅफिशियल ड्युटीज् अॅक्ट, २००५’नुसार पदाधिकाऱ्यांची बदली दर तीन वर्षांनी करणे बंधनकारक आहे. ठाणे महापालिकेचे आयुक्त म्हणून संजीव जयस्वाल यांनी ३ जानेवारी २०१५ रोजी नियुक्ती करण्यात आली. ठामपाचे आयुक्त म्हणून जयस्वाल यांनी तीन वर्षे उलटूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बदली केलेली नाही.जयस्वाल यांचे ठाण्यातील राजकीय नेत्यांशी, व्यावसायिक, बिल्डर्स आणि कंत्राटदार यांच्याशी चांगले संबंध निर्माण झाले आहेत. त्यांचा वाढदिवस सार्वजनिकरीत्या साजरा करण्यात येतो. मोठ्या पदाधिकाºयाचे राजकीय नेते, व्यावसायिक, विकासक, कंत्राटदार इत्यादींशी जवळीक निर्माण होऊ नये, यासाठी २००५ च्या कायद्यात बड्या सरकारी अधिकाºयाची दर तीन वर्षांनी बदली करण्याची तरतूद आहे. मुख्यमंत्र्यांकडे याबाबत निवेदन पाठविले होते. मात्र, त्यांनी याची दखल घेतली नाही, असे कर्णिक यांनी याचिकेत म्हटले आहे.जयस्वाल यांची बदली करण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रतिवादी करण्यात आले आहे.
‘ठामपा आयुक्त संजीव जयस्वाल यांची बदली करा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 3:39 AM