ठाणे : महावितरणच्या ४०० के.व्ही.च्या दोन वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ठाण्यासह कल्याण, वसई, भिवंडी, मुलुंड व रायगड परिसरांतील वीजपुरवठा सोमवारी दुपारी खंडित झाला होता. दुरुस्तीच्या कामामुळे महावितरणला आपत्कालीन भारनियमन घ्यावे लागले होते. परंतु, रात्री उशिरापर्यंत काही भागांचा वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. आधीच पावसाळा लांबल्याने उकाड्याने जनता हैराण झाली असतानाच सोमवारी दुपारी महावितरणची अचानक बत्ती गुल झाली. तळेगाव-कळवा ४०० के.व्ही. वाहिनीचा वीजपुरवठा इन्शुलेटरच्या बिघाडामुळे खंडित झाला. तसेच खारघर-पडघा ४०० के.व्ही. वाहिनीचे कंडक्टर नादुरुस्त झाले. या दोन्ही वाहिन्यांवरील बिघाडामुळे पडघा ते कळवा ही वाहिनी अतिभारित झाली. त्यामुळे पडघा आणि कळवा उपकेंद्रांच्या भागात आत्पकालीन भारनियमन घ्यावे लागले. या कालावधीत वीजपुरवठा खंडित झाला होता. (प्रतिनिधी)
ठाण्यासह, भिवंडी, रायगडची बत्ती गुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2016 1:44 AM