ठाणे आणि बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे काम सुरू होणार; प्रकल्पास मिळाली राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी
By सचिन लुंगसे | Published: February 4, 2024 11:19 AM2024-02-04T11:19:15+5:302024-02-04T11:19:33+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात या कामाचे भूमीपूजन होण्याची शक्यता
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील मुंबई आणि ठाणे या जिल्ह्यांना जोडून वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला आहे. त्यानुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भूमिगत भुयारी मार्गाच्या सहाय्याने ठाणे आणि बोरिवली दरम्यानचे अंतर कमी होणार आहे. ज्यामुळे या भागातील प्रवासाच्या वेळेत सुमारे १ तासांची बचत होणार आहे. या प्रकल्पातील भुयारी कामासाठी महत्त्वाची असलेली राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी सोशल मीडियाद्वारे मुंबई महानगर प्रदेशातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पास राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १९ फेब्रुवारी रोजी कोस्टल रोडच्या उद्घाटनासाठी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्या दरम्यान ठाणे आणि बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन होण्याची शक्यता आहे.
- प्रकल्पाची किंमत १६ हजार ६०० कोटी आहे.
- प्रकल्पाच्या व्याप्तीमध्ये १०.२५ किमीचा बोगदा आणि १.५५ किमीचा पोहचमार्ग असा १३.०५ मीटर अंतर्गत व्यासासह सुमारे १२ किमी लांबीचा दुहेरी भूमिगत बोगदा आहे.
- बोगद्याच्या दोन्ही बाजूस २+२ मार्गिकांसह आपत्कालीन मार्ग आहे.
- प्रत्येक ३०० मीटरवर पादचारी क्रॉस पॅसेज आणि प्रत्येक २ पादचारी क्रॉस पॅसेजनंतर वाहन क्रॉस पॅसेजची तरतूद
- बोगद्यांचे बांधकाम आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आणि चार टनल बोरिंग मशिनच्या मदतीने होणार.
- सुमारे १२ किमी लांबीच्या प्रकल्पातील ४.४३ किमी लांबी ही ठाणे जिल्ह्यातून तर ७.४ किमी लांबी ही बोरीवलीमधून प्रस्तावित आहे.
- बोगद्यांमध्ये अग्निशामक यंत्रे, पाण्याची नाळी, स्मोक डिटेक्टर, एलईडी लाईटचे संकेत फलक लावले जातील.
- बोगद्यात नैसर्गिक किंवा यांत्रिक मार्गाने पुरेशी वायुविजन प्रणाली उभारली जाईल.
- संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणारा हा प्रकल्प आहे.
- पूर्व-पश्चिम लिंक रोड तयार होऊन राष्ट्रीय महामार्ग ३ आणि ८ मधील अवजड व्यावसायिक वाहतुकीसाठी कॉरिडॉर म्हणून कार्यरत राहील.
- सद्यःस्थितीत ठाणे ते बोरिवली दरम्यान घोडबंदर मार्ग २३ किमी अंतराच्या प्रवासासाठी सकाळी आणि संध्याकाळी वर्दळीच्या वेळी एक ते दोन तास आणि इतर वेळी किमान एक तास लागतो.