ठाणे - बोरीवली प्रवास येणार १२ मिनिटांवर!; भुयारी दुहेरी मार्गाचे आज भूमिपूजन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 06:54 AM2024-07-13T06:54:04+5:302024-07-13T06:54:17+5:30
ठाणे-बोरीवली ट्विन टनेल प्रकल्पाचे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे.
मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरांना थेट ठाण्याशी जोडणी देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ठाणे-बोरीवली ट्विन टनेल प्रकल्पाचे शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन होत आहे. १६ हजार ६०० कोटी रुपये खर्चून हा भुयारी मार्ग उभारला जात आहे.
यामध्ये १०.२५ किमी लांबीचे बोगदे उभारले जाणार आहेत. हा देशातील सर्वांत लांब भुयारी मार्ग ठरणार असून प्रत्येकी दोन मार्गिकांचे दोन जुळे बोगदे उभारले जाणार आहेत. ठाणे बोरिवली प्रवासासाठी सध्या दीड तास वेळ लागतो. मात्र या भुयारी मार्गाने ठाणे आणि बोरीवली अधिक जवळ येणार असून हा प्रवास केवळ १२ मिनिटांमध्ये करणे शक्य होणार आहे. पावसाळा संपताच बोगद्यांच्या उभारणीला सुरुवात होणार असून मे २०२८ मध्ये यावरून वाहने धावू शकणार आहेत.
प्रकल्पाची लांबी - ११.८ किमी
एकूण बोगदे - प्रत्येक दिशेच्या वाहतुकीसाठी दोन जुळे बोगदे
बोगद्याची लांबी - १०.२५ किमी
पोहच मार्ग - १.५५ किमी
मार्गिका - प्रत्येकी २
प्रकल्पाचे फायदे
ठाणे बोरिवली प्रवासाचा कालावधी १ तासाने घटणार.
पूर्व पश्चिम असा सिग्नलरहित प्रवास शक्य होणार.
अंतर १२ किमीने घटणार.
घोडबंदर रस्त्यावरील कोंडी सुटण्यास मदत मिळणार.
पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूककोंडी कमी होणार.
दररोज १ लाख वाहने धावण्याचा एमएमआरडीएचा दावा.
प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर प्रतिवर्ष दीड लाख मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन घटणार.