ठाणे : ठाणे ते बोरीवली मार्गाला वाहतूककोंडीचा फटका बसत असल्याने टिकुजिनीवाडी ते बोरिवली हा प्रवास भुयारीमार्गे होऊ शकतो का, याचा विचार सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. यासाठी सल्लागारही नेमण्यात आले असून हा रस्ता तयार झाल्यास हे अंतर १० मिनिटांत कापता येऊ शकणार असल्याचा दावाही त्यांनी केला. त्यानुसार, याचा अभ्यास एमएसआरडीसीकडून सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच गायमुख ते चायना ब्रिजपर्यंत एलिव्हेटेड पुलाच्या कामाला ५१८ कोटींचा निधी मंजूर झाला असून केवळ वन विभागाच्या अडचणी दूर झाल्यानंतर याचेही काम सुरू होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईकडे जाणाऱ्या कापूरबावडी उड्डाणपुलाच्या ८०० मीटर लेनचा शुभारंभ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी त्यांच्यासमेवत विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे, आमदार प्रताप सरनाईक, महापौर संजय मोरे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. गायमुख ते चायना ब्रिजपर्यंत एलिव्हेटेड पुलाच्या कामाला ५१८ कोटींचा निधी राज्य शासनाने मंजूर केला असून या कामी आता केवळ वन खात्याच्या काही अडचणी असून त्या दूर करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर यापुढे अपघात होऊ नयेत, यासाठीदेखील युद्धपातळीवर काम सुरू असून भविष्यात हा मार्ग वाहनचालकांना सोयीचा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. मुंबई-नागपूर या ८०० किमीच्या रस्त्याचेही काम लवकरच सुरू होणार असून हे काम एमएसआरडीसीच्या माध्यमातून केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. जर्मनीच्या धर्तीवर हे काम करण्यात येत असून हे एक मोठे आव्हान असले तरी ते पेलण्यास आम्ही सज्ज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
ठाणे-बोरीवली प्रवास १० मिनिटांत होणार
By admin | Published: August 18, 2015 2:02 AM