पोलीस हौसिंगला बढती; व्यंकटेशम सिव्हिल डिफेन्सला, बिष्णोईंची ‘एल अँड टी’मध्ये नियुक्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या राज्यातील महासंचालक पदाच्या पदोन्नतीला अखेर मंगळवारी मुहूर्त मिळाला. ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह तिघांना डीजी म्हणून बढती देण्यात आली. त्यांना पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळात, तर के. व्यंकटेशम यांची नागरी संरक्षण आणि संदीप बिष्णोई यांची न्यायिक व तांत्रिक विभागात पदोन्नतीवर बदली करण्यात आली आहे.
गृह विभागाच्या वतीने सायंकाळी त्याबाबतचे आदेश बजाविण्यात आले. ठाण्याच्या आयुक्तपदाचा तात्पुरता पदभार सहआयुक्त सुरेश कुमार मेखला यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
डीजी दर्जाची तीनही पदे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त होती. मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्या ‘लेटरबॉम्ब’नंतर पोलीस दलात मोठ्या घडामोडी घडल्या. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष झाले होते. अखेर गेल्या आठवड्यात पदोन्नतीसाठी आस्थापना मंडळाची बैठक झाली. त्यामध्ये सेवाज्येष्ठतेनुसार तिघांच्या बढतीला मान्यता देण्यात आली. १९८८च्या बॅचचे आयपीएस व नक्षल विरोधी विशेष अभियानचे अपर महासंचालक व्यंकटेशम यांना रश्मी शुक्ला प्रतिनियुक्तीवर गेल्याने रिक्त असलेल्या ‘सिव्हिल डिफेन्स’मध्ये बढती देण्यात आली, तर १९८९ बॅचचे रेल्वेचे एडीजी बिष्णोई यांची न्यायिक व तांत्रिक विभागात आणि फणसाळकर यांची ''पोलीस हौसिंग''मध्ये बढती केली. ही दोन्ही पदे अनुक्रमे हेमंत नगराळे यांची मुंबई आयुक्तपदी व बिपीन बिहारी हे निवृत्त झाल्याने रिक्त होती.
.........................