ठाणे : ठाणे महापालिकेच्या महासभेत बसणाऱ्या नगरसेवकांना राष्ट्रगीतच म्हणता येत नसल्याची बाब शुक्रवारी झालेल्या महासभेत सदस्यांनीच मान्य केली. त्यामुळे आता यापुढे महासभेत राष्ट्रगीताची धून वाजविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या महासभेत गोंधळ सुरू असतानाच विरोधी पक्षाने अचानकपणे राष्ट्रगीत सुरू केले होते. यामुळे राष्ट्रगीताचा अवमान झाल्याची टीका होऊ लागली होती. परंतु, यापुढे होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे.शुक्रवारी सभा सुरू होताच सदस्य संजय घाडीगावकर यांनी राष्ट्रगीत कधी घेता येऊ शकते, ते कोणी सुरू करणे अपेक्षित आहे, सचिवांनी राष्ट्रगीत म्हणणे अपेक्षित आहे का, आदी मुद्दे उपस्थित केले. चार दिवसांपूर्वीच्या महासभेत किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. याच गोंधळादरम्यान काँग्रेस आणि राष्ट्रवादीने राष्ट्रगीत सुरू केले होते. त्या वेळी अनेक लोकप्रतिनिधी तसेच प्रेक्षक गॅलरीत नागरिक आसनावर बसले होते. राष्ट्रगीत ऐकून सर्व जण काही वेळाने उभे राहिले. यामुळे राष्ट्रगीताचा अवमान झाल्याची टीका सुरू होती. याच पार्श्वभूमीवर घाडीगावकर यांनी हे मुद्दे उपस्थित केले. परंतु, याच वेळेस अनेक लोकप्रतिनिधींना राष्ट्रगीत म्हणता येत नाही आणि लय, सुरात राष्ट्रगीत म्हटले जात नसल्याचा मुद्दा शिवसेनेचे नगरसेवक बालाजी काकडे यांनी उपस्थित केला. त्यामुळे यापुढे राष्ट्रगीताचा अवमान होऊ नये म्हणून सभागृहात राष्ट्रगीताची धून वाजविण्यात यावी, अशी सूचना त्यांनी केली. विशेष म्हणजे महापौरांनीदेखील ही बाब मान्य केली.
ठाण्यातील नगरसेवकांना राष्ट्रगीत म्हणताच येत नाही
By admin | Published: April 11, 2015 10:34 PM