ठाणे खाडीचे पाणी होणार शुद्ध

By admin | Published: June 14, 2016 03:16 AM2016-06-14T03:16:31+5:302016-06-14T03:16:31+5:30

यंदाची आणि भविष्यात निर्माण होणारी पाणीसमस्या लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने खाडीतील पाण्यावर प्रक्रिया करून, त्यापासून पिण्याचे पाणी तयार करण्याचा प्रकल्प उभारण्याचा

Thane creek water will be clean | ठाणे खाडीचे पाणी होणार शुद्ध

ठाणे खाडीचे पाणी होणार शुद्ध

Next

ठाणे : यंदाची आणि भविष्यात निर्माण होणारी पाणीसमस्या लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने खाडीतील पाण्यावर प्रक्रिया करून, त्यापासून पिण्याचे पाणी तयार करण्याचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे ठाणेकरांना दिवसाला २० दशलक्ष लीटर पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.
कशेळी येथील खाडीपात्रात आठ मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प उभारण्याचीही तयारी पालिकेने केली आहे. हे दोन्ही महत्त्वाकांक्षी प्रकल्प पीपीपी तत्त्वावर उभारण्यात येणार असून, या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आले आहेत.
सध्या ठाणे शहराला विविध स्रोतांपासून रोज ४८० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. सध्याच्या कपातीमुळे दररोज ३१४ दशलक्ष
लीटर पाणी ठाणेकरांना मिळते. त्यामुळे आठवड्यातून दोन ते
तीन दिवस पाणीपुरवठा बंद
ठेवावा लागतो.
या पाणीकपातीवर पालिकेने विविध उपाय योजले असून, त्यात रेन वॉटर हार्वेस्टिंग व वॉटर
रिसायकलिंग आदींचा समावेश
आहे, परंतु आता यापुढे
जाऊन पालिकेने खाडीतील पाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी शुद्ध करून, त्याचा वापर पिण्यासाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पुण्याच्या मे. अ‍ॅक्वालँग इंडिया प्रा.लि. कंपनीला हे काम देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
खाडीकिनारी तांत्रिकदृष्ट्या योग्य ठिकाणी दैनंदिन २० दशलक्ष लीटर पाण्याची प्रक्रिया (विक्षारण) करून पिण्याचे पाणी तयार करण्यात
येणार आहे.
या कामासाठी पालिका सल्लागार नेमणार असून, त्यासाठी १५ लाखांचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

खाडीतील पाण्यापासून वीज
याशिवाय, उल्हास नदीच्या खाडीपात्रात कशेळी येथे पाइपलाइन पुलाखाली भरती आणि ओहोटीवर आधारित जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. शहराच्या पूर्व भागातून उल्हास नदी वसईच्या खाडीत विसर्जित होते. समुद्रात होणाऱ्या भरती व ओहोटीमुळे दिवसातून दोन वेळा नदीतील पाण्याची पातळी वाढते व दोन वेळा कमी होते. नदीमुळे पाण्याचा प्रवाह नदीकडून खाडीकडे आणि खाडीकडून नदीकडे होतो. हाच आधार घेत, पालिकेने तेथे वीजनिर्मितीचा प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले आहे. अशा प्रकारचा विद्युत प्रकल्प फ्रान्स येथे कार्यान्वित आहे.
पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, यातून रोज ८ मेगावॅट वीज निर्माण होणार आहे. १० वर्षांसाठी या प्रकल्पाची निगा-देखभाल संबंधित ठेकेदार करणार असून, त्यानंतर तो ठाणे महापालिकेकडे हस्तांतरित केला जाणार आहे. त्यामुळे पालिकेला उत्पन्नाचा नवा स्रोत मिळणार आहे. या प्रकल्पासाठी ३० ते ५० टक्के भांडवली निधी हा केंद्र सरकारकडून उपलब्ध होणार आहे. यातून निर्माण होणारी वीज महापालिका विकत घेणार आहे. ती वीज महावितरणच्या दरापेक्षा स्वस्तात उपलब्ध होणार आहे.

होणारे फायदे
हे पाणी बाटलीबंद स्वरूपात उपलब्ध होणार आहे, तसेच हे पाणी विकून संबंधित ठेकेदाराला फायदा होणार आहे. या प्रकल्पाच्या उभारणीपासून पुढील २५ वर्षे निगा-देखभालीचा खर्चही संबंधित ठेकेदार करणार आहे. त्यानंतर, हा प्रकल्प पालिकेकडे हस्तांतरित होणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी सर्व मंजुरीदेखील पालिका घेऊन देणार आहे.

खर्च ठेकेदाराचा, वीजबिल पालिकेचे
अशा प्रकारचे प्रकल्प जगभरात आॅस्ट्रेलिया, चीन, जपान, आखाती देश, युरोपियन देश, उत्तर आफ्रि का आदी ठिकाणी कार्यरत आहेत. भारतात चेन्नई, गुजरात आदी ठिकाणी अशा प्रकारचे प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पासाठी लागणारा भांडवली व महसुली खर्च संबंधित ठेकेदाराने करायचा आहे, तसेच हे पिण्यायोग्य असलेले पाणी संबंधित ठेकेदार निविदेत नमूद केलेल्या दरानुसार महापालिकेला उपलब्ध करून देईल. या प्रकल्पासाठी महापालिका खाडीकिनारी जागा देणार आहे, तसेच यासाठीच्या विजेचे बिलही पालिका भरणार आहे.

Web Title: Thane creek water will be clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.