Join us

ठाणे जिल्हा परिषद, १३ पंचायत समित्या होणार बरखास्त!

By admin | Published: June 14, 2014 2:38 AM

या जिल्ह्याचे विभाजन झाल्यामुळे गेल्या ५२ वर्षांपासून कार्यरत असलेली ठाणे जिल्हा परिषद बरखास्त होणार असून, ठाणे आणि पालघर अशा दोन स्वतंत्र जिल्हा परिषदा अस्तित्वात येणार आहेत

सुरेश लोखंडे, ठाणेया जिल्ह्याचे विभाजन झाल्यामुळे गेल्या ५२ वर्षांपासून कार्यरत असलेली ठाणे जिल्हा परिषद बरखास्त होणार असून, ठाणे आणि पालघर अशा दोन स्वतंत्र जिल्हा परिषदा अस्तित्वात येणार आहेत. तसेच गट व गणांची पुनर्रचना होणार असल्याने जिल्ह्यातील १३ पंचायत समित्याही बरखास्त होणार आहेत.सध्याच्या ठाणे जिल्हा परिषदेत ६६ सदस्य आहेत.यापैकी ३५ सदस्य नव्या पालघर जिल्ह्यातील असणार आहेत. तर ३१ सदस्य ठाणे जिल्ह्यातील असणार आहेत. नव्या जिल्ह्याच्या स्थापनेची अधिसूचना जारी होताच या ३५ सदस्यांचे सदस्यत्व संपुष्टात येणार आहे व उर्वरित ३१ सदस्यांच्या अस्तित्वावर जिल्हा परिषद चालवता येत नाही. त्यामुळे जिल्हा परिषद बरखास्त करून दोन स्वतंत्र जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदांची स्थापना करून त्यांच्या निवडणुका घेणे सरकारला भाग पडणार आहे. १२ आॅगस्ट १९६२ रोजी ठाणे जिल्हा परिषदेची स्थापना झाली. तिने आतापर्यंत १८ अध्यक्ष पाहिलेत. पांडुरंग देशमुख हे पहिले अध्यक्ष होते. तर सारिका सुरेश गायकवाड या विद्यमान अध्यक्ष आहेत. जिल्हा विभाजनानंतर जर ५० अथवा त्यापेक्षा जास्त विद्यमान सदस्य राहिले असते तरी ही जि.प. बरखास्त करण्याची पाळी सरकारवर ओढावली नसती. जि.प. सोबतच १३ पंचायत समित्याही बरखास्त होणार आहेत. कारण बरखास्ती ते नवीन निवडणुका होऊन नवे पदाधिकारी व सदस्य सत्तेवर येईपर्यंतच्या काळात जिल्हा परिषदेची सूत्रे सीओंच्या तर पंचायत समित्यांची सूत्रे गटविकास अधिकाऱ्यांच्या ताब्यात राहण्याची शक्यता आहे.