ठाणे : या जिल्ह्याचे एका अर्थाने दुसऱ्यांदा विभाजन झाले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ठाणे हा प्रचंड आकारमान असलेला जिल्हा होता. त्याचे प्रशासन अवघड झाले म्हणून १८६९ साली ब्रिटिशांनी विभाजन करून कुलाबा जिल्हा निर्माण केला होता. त्यानंतर आता म्हणजे १४५ वर्षांनी त्याचे पालघर जिल्ह्याच्या निर्मितीच्या रुपाने दुसऱ्यांदा विभाजन झाले. पालघर हा महाराष्ट्रातील ३६ वा जिल्हा ठरणार आहे.कुलाबा जिल्ह्याची निर्मिती झाली तरी आशिया खंडातील सर्वात मोठा जिल्हा हा त्याचा लौकिक कायम होता. तो मात्र आता भौगोलिक क्षेत्रफळाच्या निकषावर नष्ट होणार आहे. महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतर अनेक नव्या जिल्ह्यांची निर्मिती करण्यात आली. तिचा शुभारंभ १ मे १९८१ रोजी बॅ. ए.आर. अंतुले हे मुख्यमंत्री असताना त्यांनी रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून सिंधुदुर्ग या जिल्ह्याची तसेच औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन करून जालना जिल्ह्याची निर्मिती करून केला होता व कुलाबा जिल्ह्याचे नामांतर त्यांनी रायगड असे केले होते. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रथमच जिल्ह्यांचे विभाजन या रुपाने झाले होते. त्यानंतर मग १५ आॅगस्ट १९८२ रोजी उस्मानाबाद जिल्ह्याचे विभाजन करून लातूर जिल्ह्याची निर्मिती केली गेली. तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून गडचिरोली या नव्या जिल्ह्याची निर्मिती केली गेली.१९९८मध्ये धुळे जिल्ह्याचे विभाजन करून नंदुरबार जिल्ह्याची व अकोला जिल्ह्याचे विभाजन करून वाशिम या जिल्ह्याची निर्मिती केली गेली. तर १९९९ मध्ये परभणी जिल्ह्याचे विभाजन करून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती केली गेली. त्यानंतर आता ठाण्याचे विभाजन करून पालघर या नव्या जिल्ह्याची निर्मिती केली गेली आहे. नाशिकच्या विभाजनाची मागणीही अनेक वर्षांपासून जोर धरते आहे.
ठाणे जिल्ह्याचे झाले दुसऱ्यांदा विभाजन !
By admin | Published: June 13, 2014 11:07 PM