ठाण्यात रुग्णालयाच्या नवीन नोंदणीसह नूतनीकरण महागणार
By admin | Published: June 12, 2015 12:30 AM2015-06-12T00:30:40+5:302015-06-12T00:30:40+5:30
ठाणे महापालिका क्षेत्रात चालविली जाणारी खाजगी रुग्णालये, प्रसूतिगृहे व डे केअर सेंटर अशा सर्व आस्थापनांचे नोंदणीकरण
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात चालविली जाणारी खाजगी रुग्णालये, प्रसूतिगृहे व डे केअर सेंटर अशा सर्व आस्थापनांचे नोंदणीकरण व त्यांचे नूतनीकरण आता महागणार आहे. यानुसार, महापालिकेने तीन हजार रुपयांपासून थेट १० लाखांपर्यंत वाढ करण्याचे ठरविले असून तसा प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवणार आहे.
सध्या या रुग्णालयांचे आणि डे केअर सेंटरचे नोंदणीकरण व त्यांचे नूतनीकरण बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन अॅक्ट १९४९ अन्वये करण्यात येते. या कायद्यान्वये महापालिका क्षेत्रातील रुग्णालयांची नोंदणी व नूतनीकरण करण्यासाठी २०१२-२०१५ या तीन वर्षांकरिता आकारण्यात येणाऱ्या फीसाठी मान्यता घेण्यात आली होती. परंतु, त्याची मुदत संपल्याने आता २०१५ पासून पुढील नोंदणी व नूतनीकरण करण्यासाठी नवे दर पालिकेने निश्चित केले आहेत. त्यानुसार, आता १ ते ५ खाटांच्या रुग्णालयांसाठी २५०० ऐवजी ३ हजार आकारले जाणार आहेत, तर १०१ ते १५० खाटांच्या रुग्णालयांसाठी २ लाख ५० हजारांऐवजी ५ लाख आकारले जाणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव येत्या १९ जून रोजी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवणार आहे.