Join us

ठाणे मेट्रो चार वर्षांत अशक्य

By admin | Published: February 23, 2016 2:21 AM

शिवसेनेच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या नाट्यसंमेलनाच्या समारोपाला उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांनी चार वर्षांनी मेट्रोतून ठाण्यात येणार असल्याचा शब्द दिला असला

ठाणे : शिवसेनेच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या नाट्यसंमेलनाच्या समारोपाला उपस्थित असलेल्या मुख्यमंत्र्यांनी चार वर्षांनी मेट्रोतून ठाण्यात येणार असल्याचा शब्द दिला असला तरी या मेट्रो मार्गाबाबत अजून कोणत्याही हालचाली झालेल्या नसल्याने एवढ्या कमी काळात हा मार्ग पूर्ण होणे अशक्य असल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेने ठाण्यातील भाजपा नेत्यांत आनंदाचे वातावरण आहे, तर आपण आग्रह धरूनही त्याचे श्रेय घेण्यासाठी भाजपाने कंबर कसल्याने शिवसेनेत अस्वस्थता आहे. मात्र, कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने स्मार्ट शहराचा आणि त्यासाठीच्या साडेसहा हजार कोटींच्या तरतुदींचा मुद्दा उचलून धरत भाजपाने मते मिळवली आणि निवडणुकीनंतर त्याबाबत हात झटकले, तशीच अवस्था मेट्रोचीही होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ९६ व्या नाट्यसंमेलनाच्या समारोपावेळी १०० वे संमेलनही ठाण्यात व्हावे, अशी इच्छा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली. त्याचा संदर्भ घेत मुख्यमंत्र्यांनी चार वर्षांनी नाट्यसंमेलनाच्या शतकमहोत्सवासाठी ठाण्यात येताना मेट्रोनेच येईन, असे सांगत तोवर मेट्रो पूर्ण होईल, असे अप्रत्यक्षरीत्या जाहीर केले. हा मार्ग पूर्ण व्हावा, म्हणून शिवसेनेने आग्रह धरला आहे. मात्र, निवडणुकीच्या तोंडावर या मार्गाला परवानगी देऊन त्याचा प्रचारात वापर करण्याची भाजपाची खेळी आहे. यापूर्वी ठाणे शहर स्मार्ट करण्याचा मुद्दा चर्चेत होता. मात्र, स्मार्ट शहरांच्या पहिल्या यादीत ठाण्याचा समावेश न झाल्याने तूर्त तो मुद्दा मागे पडला आहे. जूनपर्यंत जाहीर होणाऱ्या दुसऱ्या यादीत ठाण्याचा समावेश झाला की, तो मुद्दाही चर्चेत येईल. तोवर, मेट्रोचा मुद्दा हा विकासासाठी, प्रचारासाठी वापरला जाईल. तशी तयारी भाजपामध्ये सुरू आहे. ठाणे-कल्याण मेट्रोही सर्वेक्षणाच्या पातळीवर मुंबईतून येणाऱ्या ठाणे मेट्रोला पूरक ठरेल, असा ठाणे-भिवंडी-कल्याण मोनो मार्ग बांधण्याचेही एमएमआरडीएचे नियोजन आहे. मात्र, ते अजून सर्वेक्षणाच्या पातळीवर आहे. भूसंपादनाचा प्रश्नच गंभीरशिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी या मार्गासाठी गेल्या महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तेव्हा दोन महिन्यांत या मार्गाचे काम सुरू होईल, असे आश्वासन फडणवीस यांनी त्यांना दिले होते. दोन महिन्यांत काम सुरू झाले नाही, तर त्यासाठी उपोषणाला बसण्याचा इशाराही सरनाईक यांनी दिला होता. या मार्गासाठी भूसंपादन ही मोठी अडचण आहे. रेल्वे स्थानकांनाही पुरेशी जागा मिळणार नसल्याने कॅडबरी जंक्शन, वागळे इस्टेट, तीनहातनाका, गोल्डन डायस नाका ही स्थानके भूमिगत करण्याचे नियोजन आहे. तर, कासारवडवली, वाघबीळ, टिकुजिनीवाडी, पातलीपाडा, मानपाडा ही स्थानके उंचावर असतील. मात्र, हा प्रकल्प आधीच दोन वर्षे लांबल्याने त्याचा खर्चही वाढण्याची चिन्हे आहेत. वडाळा-ठाणे मेट्रो मार्ग आहे तरी कसा?वडाळा-घाटकोपर-तीनहातनाका-कासारवडवली असा हा ३२ किमीचा मेट्रो मार्ग आहे. त्यातील २७ किमीचा मार्ग जमिनीखाली, तर पाच किमीचा जमिनीवरून असेल.या मार्गाचा प्राथमिक टप्प्यातील खर्च १९ हजार कोटींचा आहे.या मार्गाचे काम २०१७ मध्ये सुरू करून ते २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. तसा उल्लेख एमएमआरडीएच्या वेबसाइटवर आहे.या मार्गावर एकूण ३० स्थानके असतील. साधारण एक तास पाच मिनिटांत हे अंतर कापले जाईल आणि दर चार मिनिटांनी त्यावर गाडी धावेल. साधारण १२ लाख प्रवाशांना त्याचा फायदा होईल, असा अंदाज आहे.