ठाणे-मुंबई पेन्शन दिंडी २ आॅक्टोबरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 05:46 AM2018-07-21T05:46:42+5:302018-07-21T05:46:57+5:30
राज्य शासनात नवी पेन्शन योजना लागू झालेल्या कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेची मागणी करीत मंत्रालयालाच घेराव घालण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई : राज्य शासनात नवी पेन्शन योजना लागू झालेल्या कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन योजनेची मागणी करीत मंत्रालयालाच घेराव घालण्याचा इशारा दिला आहे. आक्रमक झालेल्या महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने २ आॅक्टोबरला ठाण्यातून मुंबईपर्यंत पेन्शन दिंडी काढण्याचा इशाराही सरकारला दिला आहे.
संघटनेचे राज्य संपर्क प्रमुख प्राजक्त झावरे-पाटील म्हणाले, ठाणे तीन हात नाका ते मुंबई मंत्रालय अशी ही पेन्शन दिंडी निघेल. मागण्या पूर्ण होईपर्यंत मंत्रालयाला घेराव घातला जाईल. तत्पूर्वी संघटनेच्या शिष्टमंडळाने नागूपर विधिमंडळ अधिवेशनादरम्यान मागण्यांचा पाठपुरावा केला आहे. १ नोव्हेंबर २००५ नंतर नोकरीस लागलेल्या सरकारी, निमसरकारी, सरकारशी संलग्नित स्वायत्त संस्था यांतील कर्मचारी यांना सरकारने जुनी पेन्शन योजना नाकारत नवीन पेन्शन योजना लागू केली आहे. त्यामुळे नव्या कर्मचाºयांमध्ये नाराजी असल्याचेही झावरे-पाटील यांनी सांगितले. दिंडी काढून मंत्रालय घेरण्याचा निर्णय नुकताच घेतल्याचे संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर म्हणाले.
>असे असेल आंदोलन!
२ आॅक्टोबर रोजी ठाणे ते मुंबई पेन्शन दिंडी काढण्यात येईल. त्यानंतर ३ आॅक्टोबरपासून मंत्रालयाला बेमुदत काळासाठी घेराव घातला जाईल. दरम्यान, शासनाने मागण्या मान्य न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेचे राज्य सचिव गोविंद उगले यांनी दिला आहे. या आंदोलनात सुमारे एक लाखाहून अधिक कर्मचारी सहभागी होतील, असा दावाही उगले यांनी केला आहे.