ठाणे महापालिकेला पाहिजे रक्षक
By admin | Published: July 11, 2015 11:31 PM2015-07-11T23:31:01+5:302015-07-11T23:31:01+5:30
महापालिका मुख्यालयात वारंवार होणारी आंदोलने, जलकुंभ, प्रभाग समिती, नाट्यगृह, दादोजी कोंडदेव स्टेडिअम यासह इतर ठिकाणी सुरक्षारक्षकांची वानवा असल्याची माहिती
ठाणे : महापालिका मुख्यालयात वारंवार होणारी आंदोलने, जलकुंभ, प्रभाग समिती, नाट्यगृह, दादोजी कोंडदेव स्टेडिअम यासह इतर ठिकाणी सुरक्षारक्षकांची वानवा असल्याची माहिती समोर आली आहे. महापालिकेची स्थापना झाल्यापासून जेवढे सुरक्षारक्षक होते, तेवढेच आजही आहेत. महापालिकेचा विस्तार झाला असतानादेखील आजही पालिकेने त्यांची नवीन भरती केलेली नाही. आजघडीला ३०८ सुरक्षारक्षकांसह २ सुरक्षा पर्यवेक्षक असे मिळून ३१० सुरक्षारक्षकांची गरज आहे. ही भरती केली तरी त्यासाठी ५ कोटी ५८ लाख ४८ हजारांचा वार्षिक खर्च पालिकेला पेलवणे कठीण जाणार आहे.
सध्या पालिकेकडे स्वत:चे आणि सुरक्षा मंडळाचे मिळून ५०० सुरक्षारक्षक आहेत. तर मागील पाच वर्षांपासून मुख्य सुरक्षा अधिकाऱ्याचेही पद रिक्त आहेत. याशिवाय, सहायक सुरक्षा अधिकारी- ३, आरक्षक- ११५, सुरक्षा मंडळाकडील सुरक्षा पर्यवेक्षक- १० आणि ३७५ सुरक्षारक्षक असा एकूण सुरक्षारक्षकांचा ताफा आहे. परंतु, मुख्यालयाची परिस्थिती पाहता चार मजल्यांच्या मुख्यालयात ४६ आरक्षक, २ सुरक्षा पर्यवेक्षक आणि ३५ सुरक्षारक्षक आहेत. परंतु, येथे वारंवार होणारी आंदोलने, मोर्चे यामुळे हा कोटाही कमी पडत असून या ठिकाणी आणखी १५ सुरक्षारक्षकांची आवश्यकता असल्याची माहिती सुरक्षा विभागाने दिली. याशिवाय, वर्तकनगर प्रभाग समितीत- १०, कळवा- १०, माजिवडा- मानपाडा- १२, उथळसर- १०, मुंब्रा, दिवा, कौसा प्रभाग समिती- ८, वागळे, रायलादेवी- ७, कोपरी- ८, दादोजी कोंडदेव- ५, डॉ. काशिनाथ घाणेकर- ५, गडकरी- ५, कळवा रुग्णालय- ३, नौपाडा- २ अशी एकूण १०० सुरक्षारक्षकांची आवश्यकता आहे. (प्रतिनिधी)
मंडळाच्या रक्षकांवरच पालिकेची सुरक्षा मदार
सचिव मंडळाकडून वारंवार पालिका सुरक्षारक्षक घेत असते. त्यांचे वर्षभराचे कंत्राट संपल्यानंतर पुन्हा मुदतवाढ दिली जात आहे. परंतु, त्यानंतर जोपर्यंत मुदतवाढीचा प्रस्ताव मंजूर होत नाही, तोपर्यंत त्यांचा पगार निघत नाही. भरती प्रक्रिया रखडल्याने मंडळाच्या सुरक्षारक्षकांवरच भार पडत आहे.
भरती प्रक्रिया रखडलेलीच...
ठाणे महापालिकेने काही वर्षांपूर्वी सुरक्षारक्षकांची भरती प्रक्रिया हाती घेतली होती. परंतु, यातील काही उमेदवार या भरतीच्या विरोधात न्यायालयात गेल्याने ती अखेर रद्द करण्यात आली. त्यानंतर, दोन वर्षांपूर्वी पुन्हा ३८० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली. परंतू आॅनलाईन प्रक्रिया वादग्रस्त ठरली.
एकाला करावे लागते तीन शिफ्टमध्ये काम...
महापालिकेच्या सर्व प्रभाग समित्या व त्याअंतर्गत येणारी उपप्रभाग कार्यालये, उद्याने या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आरक्षक संख्या कमी असल्याने या ठिकाणी तीन पाळ्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था पुरविणे शक्य होत नाही. यामुळेच काही ठिकाणी एकेका सुरक्षारक्षकाला तब्बल तीन पाळ्यांमध्ये काम करावे लागत आहे.