अजित मांडके, ठाणेठाणे महापालिका शिक्षण मंडळ शाळांच्या दुरवस्थेची लोकमतने सविस्तर वृत्तमालिकेद्वारे चिरफाड केल्यानंतर प्रशासनाने १३४ शाळांच्या ८५ इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण केले असून यात २९ शाळा या २५ ते ३० वर्षे जुन्या असल्याने त्यांच्या सर्वांगीण दुरुस्तीची गरज असल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने शिक्षण विभागाकडे दिला आहे. या शाळांमध्ये १२ हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यांचा जीव टांगणीला लागला आहे. तसेच ४ शाळा या धोकादायक घोषित केल्या असून तेथील विद्यार्थ्यांचे इतर ठिकाणी पुनर्वसन केले आहे. एकूणच या ८५ इमारतींचा ताळेबंद सादर झाल्याने त्याबाबत प्रशासन आता कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे. उथळसर मनपा शाळेच्या इमारतीची जाळी पडल्याची घटना २०१२ मध्ये घडली होती. यात जीवितहानी झाली नसली तरी मनपा शाळांच्या दुरुस्तीचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर, सर्वच प्राथमिक शाळांच्या स्ट्रक्चरल आॅडिटची मागणी होती. ८५ पैकी २९ इमारतींचे आयुर्मान हे २५ ते ३० वर्षांचे असून आता त्या सर्वांगीण दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. या २९ शाळांत माजिवडा - मानपाडा प्रभाग समितीतील सर्वाधिक ९ शाळांचा समावेश असून त्यानंतर कळवा-मुंब्रा ६, कोपरी २, उथळसर २, नौपाडा १ वर्तकनगर १, वागळे २ याचा समावेश आहे.प्रभागातील धोकादायक शाळामाजिवडा- मानपाडा प्रभाग समितीमधील ढोकाळी, वाघबीळ, मानपाडा, तरीचापाडा, मोघरपाडा, बाळकुम, आझादनगर, ओवळा, कासारवडवली. वागळे इस्ेटट- शांतीनगर, सावरकरनगरवर्तकनगर- शिवाईनगर, कोपरी- कोपरी गाव, पारशेवाडी,नौपाडा- दगडी शाळा कळवा-मुंब्रा - आतकोनेश्वरनगर, कळवा पोस्ट आॅफिस, आनंदनगर, दिवा, महात्मा फुलेनगर, मुंब्रा मार्केट, देवीचापाडाउथळसर- राबोडीच्या दोन शाळांचा समावेश आहे.सुविधांचीही आहे वानवा२९ इमारतींमध्ये १० ते १२ हजार विद्यार्थी सद्य:स्थितीत शिक्षण घेत असून या शाळांमध्ये अनेक सुविधांची वानवा आहे. त्यात लाद्यापासून रंग, खिडक्या, शौचालये, भिंती, जिने आदींसह सर्वच गोष्टींच्या दुरुस्तीची गरज असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.या शाळांच्या दुरुस्तीसाठी आता सविस्तर अहवाल तयार करण्यात आला असून प्रत्येक शाळेच्या कामाचा खर्च त्यात मांडला आहे. मागील वर्षीच काही शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळण्यासाठी संबंधित विभागाला तारेवरची कसरत करावी लागली होती. त्यामुळे या शाळांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळणार का, याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे. तसेच या कामासाठी सल्लागारही नेमण्यात येणार आहे.
ठाणे महापालिकेच्या २९ शाळा धोकादायक
By admin | Published: July 02, 2015 11:14 PM