ठाणे : दिवसेंदिवस ठाणे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांची घटणारी पटसंख्या, तुटपुंजे शिक्षक, शाळांचा कमी होणारा निकाल, विद्यार्थ्यांनी धरलेली खाजगी शाळांची कास आणि त्यातही शाळांची असलेली दुरवस्था, धोकादायक अवस्थेत असलेल्या शाळा, एकाच वर्गात पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गांतील विद्यार्थी दाटीवाटीने बसविणे, या सर्वच बाबींमुळे ठाणे महापालिका शाळांचा दर्जा हा खालावत जात असल्याचे स्पष्ट होत आहे. शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागांतील शाळांची तर आजही दयनीय अवस्था आहे. शौचालयांची झालेली दुरवस्था, खिडक्या दरवाजे तुटलेले, पुरेशा विजेचा अभाव यामुळे येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत.ठाणे महापालिका शाळांचा मुद्दा हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. पूर्वी महापालिका शाळांच्या ८७ इमारती होत्या. त्यात १२७ शाळा भरल्या जात होत्या. तसेच विद्यार्थ्यांची पटसंख्या ही ४२ हजारांहून अधिक होती. परंतु, कालांतराने ही परिस्थिती बदलली आणि आजच्या घडीला इमारतींची संख्या ही ७८ वर आली असून विद्यार्थ्यांची पटसंख्या ही ३४ हजारांवर आली आहे. विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ११०० शिक्षक आहेत. परंतु, तेदेखील अपुरे पडत आहेत. ३६ हून अधिक शाळांना गेल्या कित्येक वर्षांपासून मुख्याध्यापकांची वानवा आहे. काही वर्षांपूर्वी सुरू झालेल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळांचीही तीच गत असून या शाळांमध्येदेखील शिक्षकांची कमतरता तर आहेच, शिवाय पाचपैकी एकाही शाळेला मुख्याध्यापक नाही. दरम्यान, काही वर्षांपूर्वी उथळसर येथील धोकादायक ठरलेल्या शाळेची जाळी पडली होती. त्यानंतर, ही इमारत खाली करून ती पाडण्यात आली. परंतु, आजही येथे नव्या इमारतीचे काम सुरू न करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना दुसऱ्या ठिकाणी हलविण्यात आले आहे. परंतु, यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या घटली आहे. याच घटनेनंतर महापालिकेच्या सर्वच शाळांचे स्ट्रक्चर आॅडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, तीन ते चार शाळा या अतिधोकादायकच्या यादीत येऊन त्या पाडण्यात आल्या. परंतु, नव्या शाळांची कामे काही झालेली नाहीत. दिवा, मुंब्य्रातील शाळांची अवस्था तर भयावह आहे. एकेका वर्गात विविध तुकड्यांतील विद्यार्थी एकत्र शिक्षण घेत आहेत. शौचालयांची अवस्था दयनीय, पाण्याची योग्य ती सोय नसणे, आदींसह इतर प्रमुख बाबी समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी येथील शाळांची पाहणी केल्यानंतर त्यांच्यादेखील निदर्शनास या बाबी आल्या आहेत. त्यांनी या शाळांची दुरुस्ती करण्यास सांगितले आहे. परंतु, दुसरीकडे मुंब्य्रात मागील तीन वर्षांपासून नव्या शाळा इमारतीचे काम सुरू असून ते अद्याप मार्गी लागलेले नाही. तसेच इतर ठिकाणीदेखील शाळांच्या इमारतीचे काम रखडलेले आहे. इमारतींचे काम पूर्ण होत नसल्याने विद्यार्थी इतर शाळांमध्ये प्रवेश घेत असल्याचे शिक्षकच मान्य करतात. घोडबंदर भागातील शाळांचीही हीच शोकांतिका असून काही शाळा आजही भाड्याच्या खोल्यांमध्ये भरल्या जात आहेत. परंतु, त्याकडे लक्ष देण्यास पालिका प्रशासनाला वेळ नाही.विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत महापालिका प्रशासनाने काही शाळांची अवस्था सुधारत तेथे काही सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत.