ठाणे,पालघर : १०६४५ बालके कुपोषित
By Admin | Published: March 26, 2015 10:52 PM2015-03-26T22:52:13+5:302015-03-26T22:52:13+5:30
ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यात अद्यापही दहा हजार ६४५ बालके तीव्र कमी वजनाची व कुपोषित आहेत.
सुरेश लोखंडे - ठाणे
ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यात अद्यापही दहा हजार ६४५ बालके तीव्र कमी वजनाची व कुपोषित आहेत. जीव मुठीत घेऊन जगत असलेल्या या बालकांमध्ये सुमारे ५१२ बालके जीव घेण्या दुर्धर आजाराच्या चक्रव्यूहात सापडले असून त्यांचे जीवन खडतर झाले आहे.
यासाठी ६ वर्षापर्यंतच्या सुमारे तीन लाख ७५ हजार ६३७ बालकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यापैकी सुमारे तीन लाख ६२ हजार बालकांचे वजन घेऊन त्यातील सर्वसाधारण श्रेणीसह मध्यम कमी वजन आणि तीव्र कमी वजनाच्या बालकांची निवड केली आहे. यातून मध्यम व तीव्र कुपोषीतांमध्ये सुमारे दहा हजार ६४५ बालके आढळून आल्याचे महिला व बालकल्याण विभागाच्या वर्गीकरण अहवालाव्दारे उघड झाले आहेत.
सुमारे २२ प्रकल्य कार्यलयांव्दारे या कुपोषीत बालकाना सुदृढ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी महिला व बालकल्याण विभाग दोन्ही जिल्ह्यात सतर्क आहे. याशिवाय आरोग्य विभागही या बालकांच्या आरोग्याकडे लक्ष देऊन आहे. पण कुपोषीत बालकांच्या संख्येचा आलेख मागील काही वर्षांपासून कमी होताना दिसत नाही. यामुळे जिल्ह्यांमध्ये तर्कवितर्क काढले जात आहे.
दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पालघर जिल्ह्यात सध्या मध्यम कमी वजनाची सुमारे ४० हजार २१७ बालके आढळून आले आहेत. तर आठ हजार ५९१ तीव्र कुपोषीत बालके जीव मुठीत घेऊन जगत आहेत. यातील सुमारे ३२६ बालके कुपोषणाच्या दाहकतेमध्ये होरपळून निघत असतानाच जीव घेण्या दुर्धर आजाराच्या चक्रव्युहात ते सापडले आहेत. अपंगत्वासह, नाक, कान, ओठाच्या आजारासह त्वचा व डोक्याच्या आजाराने ते हैराण आहेत. तीव्र कमी वजन त्यात कुपोषण आणि दुर्धर आजारांना तोंड देत ते जीवन जगत आहे. याप्रमाणेच शहरी जिल्हा म्हधून ओळखल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात देखील सुमारे १८६ बालके दुर्धर आजाराने जर्जर आहेत. याशिवाय जिल्ह्यात सुमारे २०५४ बालके तीव्र कुपोषणाने पिडत आहेत. तर दहा हजार ९३२ बालके मध्यम कमी वजनाचे आढळले आहेत.त्यांच्या सेवेसाठी सुमारे नऊ बालविकास प्रकल्प कार्यरत आहेत. या सर्व यंत्रणेच्या कामकाजाचा आढावा घेता कुपोषीत बालकांची संख्या कमी होण्याऐवजी त्यात भर पडलेली पहायला मिळत आहेत.