मुंबई : २०१९ साली मुंबई महानगर क्षेत्रात ७७ हजार ९९० नव्या घरांचे बांधकाम सुरू झाले असून त्यात सर्वाधिक ३९ टक्के वाटा डोंबिवली, बदलापूर, पनवेल आणि त्याभोवतालच्या परिसराचा आहे. त्याखालोखाल मुंबई (२९ टक्के), नवी मुंबई (२० टक्के), ठाणे (१४ टक्के) वाटा आहे. ज्या भागात मागणी जास्त तिथे गृहनिर्माण जास्त होते हा सर्वसाधारण निकष आहे. त्यानुसार ठाण्यापल्याडची घरे परवडणारी असल्याने त्यांना जास्त मागणी असल्याचे अधोरेखित होत आहे.देशातल्या आघाडीच्या सात शहरांमधून जेवढे गृहनिर्माण होते त्यापैकी ३३ टक्के वाटा हा मुंबई महानगर प्रदेशाचा आहे. गेल्या वर्षभरात या शहरांमध्ये २ लाख ६१ हजार घरांची विक्री झाली आहे. त्यापैकी ८० हजार ८६९ घरे ही एमएमआरमधली आहेत. तर, याच कालावधीत ७७ हजार नव्या बांधकामांना सुरुवात झाली. त्यात मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील ठाणे व नवी मुंबई ही प्रमुख शहरे वगळता उर्वरित परिसरातील घरांची संख्या २८ हजार ९८८ इतकी आहे. तर, विक्री झालेल्या घरांची संख्या २५ हजार ४७२ आहे. त्यात सर्वाधिक ९ हजार ३४४ घरे डोंबिवलीत आहेत.परवडणाऱ्या किमतीतली घरे, सांस्कृतिक वारसा आणि सामाजिक सलोखा या कारणांमुळे तिथे घरे घेण्यास पसंती दिली जात असल्याचे निरीक्षण बांधकाम क्षेत्रातील ट्रेस्पेक्ट या सल्लागार कंपनीच्या सर्वेक्षण अहवालात नोंदविले आहे. नव्याने उभ्या राहात असलेल्या घरांमध्ये ४३ टक्के घरे ही ४० लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची आहेत. ती प्रामुख्याने याच भागात असल्याने त्यांना प्राधान्य मिळत आहे. घरांना मागणी जास्त असल्यामुळेच इथल्या गृहनिर्माणाचे आकडे वाढताना दिसत असल्याचेही अध्यक्ष सुनील मिश्रा यांनी सांगितले.>त्या घरांच्या विक्रीसाठी ३३ महिने लागतीलमुंबई महानगर प्रदेशात सध्या २ लाख १६ हजार घरे विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. सध्याच्या गृहखरेदीचा दर वर्षाकाठी ८० हजार ८७० इतका आहे. तो आलेख मांडला आणि याभागात नव्याने एकही घर उभे राहिले नाही, तर ही घरे विकण्यासाठी किमान ३३ महिने प्रतीक्षा करावी लागेल, असे मत या अहवालात नोंदविण्यात आले आहे.
ठाण्यापल्याडच्या घरांना सर्वसामान्यांची पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 12:04 AM