Join us

ठाण्यात रुग्ण दरवाढीचा कालावधी १० दिवसांवरुन ७८ दिवसांवर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५ टक्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 3:19 PM

महापालिकेने केलेल्या विविध स्वरुपाच्या उपाय योजनांमुळे ठाण्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८५ टक्यांवर आले आहे. तर रुग्ण दरवाढीचा वेगही मंदावला असून तो आता ७८ दिवसांवर आला आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी ही समाधानाची बाब म्हणावी लागणार आहे.

ठाणे : लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर कोरोना रुग्णांमध्ये वाढ होईल अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु पालिकेने केलेल्या विविध उपाय योजनांमुळे कोरोना बाधीत रुग्णांची संख्या घटत चालली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे आजच्या घडीला ८५ टक्यांवर आले आहे. जे जुन महिन्यात २७ टक्यांच्या आसपास होते. तर याच कालावाधीत रुग्ण दुपटीचा कालावधी हा २७ दिवसांवर होता. तोच आता ७८ दिवसांवर आला आहे. एकूणच पालिका प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध स्वरुपाच्या उपाय योजनांमुळे आणि कोरोना चाचणीचा वेग वाढविण्यात आल्याने     आजच्या घडीला २३४५ रुग्ण हे प्रत्यक्षात उपचार घेत असून १८१५१ रुग्ण हे उपचार घेऊन घरी परतले आहेत.         मागील काही दिवसात शहरात कोरोनाची संख्या ही कमालीची वाढली आहे. परंतु रुग्ण दरवाढीचा वेग हा आता ७८ दिवसांवर आला आहे. रविवार पर्यंत ठाणे शहरात २२ हजार ४ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत ६९५ जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. परंतु त्यातही मागील काही दिवसात कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ही १८१५१ एवढी झाली आहे. तर प्रत्यक्ष उपचार घेणाºया रुग्णांची संख्या ही २३४५ एवढी आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचे प्रमाण हे आता ८५ टक्यांवर आले आहे. त्यामुळे निश्चितच ही ठाण्यासाठी समाधानकारक बाब असल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे महापालिकेने शहराच्या विविध भागात केलेल्या उपाय योजनांमुळे कोरोना बाधीत रुग्णांची संख्याही घटत असल्याचे दिसत आहे. झोपडपटटी भाग हा मोठी समस्या पालिकेपुढे होती. परंतु मागील काही दिवसांमध्ये या भागातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्याही कमी झाल्याचे दिसत आहे. मुंब्य्रा सारख्या भागात शुक्रवारी कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही. तर रविवारी मुंब्य्रात अवघे दोन रुग्ण आढळले आहेत. तिकडे लोकमान्य नगरमध्येही कोरोना बाधीत रुग्णांची कमी करण्यात पालिकेला काहीसे यश आले आहे. तर वागळे सारख्या दाटीवटीने वसलेल्या लोकवस्तीमध्येही मागील काही दिवसात कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून आले आहे. रविवारी वागळे इस्टेट भागात अवघे ७ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना तत्काळ क्वॉरन्टाइन करणे, एकाच्या बदल्यात २० जणांना क्वॉरन्टाइन करणे, हायरीस्कमधील रुग्णांची साखळी तोडणे यासाठी टीम तयार करुन ज्या भागात कोरोनाचे अधिक रुग्ण वाढत आहे, त्याठिकाणी या मार्फत काम करण्यात आले आहे. तसेच आता प्रत्येक दिवशी घरोघरी जाऊन स्क्रीनीग करण्याचे प्रमाण ३० हजाराहून अधिक झाले आहे. त्यामध्ये ताप सर्व्हेक्षणही केले जात आहे. तसेच आॅक्सीजनची मात्राही तपासली जात आहे. त्यातून ज्यांना त्रास वाटत असेल त्यांना तत्काळ क्वॉरन्टाइन करुन त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. या सर्वांमुळे साखळी तोडण्यात मदत झाली असल्याचेही महापालिकेने स्पष्ट केले. दुसरीकडे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८५ टक्यांवर आले आहे.दरम्यान शहरात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत असली तरी गुणाकाराने रुग्ण वाढीचा (डबलींगचा रेटचा) कालावधी देखील वाढला आहे. जून महिन्यात दिवसांपूर्वी रुग्ण डबलींगचा कालावधी हा १० दिवसांचा होता. त्यामुळे गुणाकाराने रुग्ण वाढल्याचे दिसून आले होते. परंतु मागील काही दिवसात आता हाच डबलींगचा दर ७८ दिवसांवर गेला असल्याची माहिती महापालिकेने दिली आहे. महापालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या विविध स्वरुपाच्या उपाय योजनांमुळे कोरोना बाधीत रुग्णांची संख्या कमी होत असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. 

टॅग्स :ठाणेठाणे महापालिकाकोरोना वायरस बातम्या