प्रदीप शर्माच्या अटकेनंतर ठाण्यातील पोलीस अधिकारी ‘एनआयए’च्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:06 AM2021-06-19T04:06:07+5:302021-06-19T04:06:07+5:30
मनसुख हिरेन यांचा डायटम रिपोर्टही संशयाच्या भोवऱ्यात लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : अँटिलिया स्फोटक कार आणि ठाण्यातील व्यावसायिक मनसुख ...
मनसुख हिरेन यांचा डायटम रिपोर्टही संशयाच्या भोवऱ्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अँटिलिया स्फोटक कार आणि ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्माला अटक केल्यानंतर ठाण्यातील काही पोलीस अधिकारी ‘एनआयए’च्या रडारवर आल्याचे समोर येत आहे. त्यात हिरेन यांचा डायटम रिपोर्टही संशयाच्या भोवऱ्यात अडकला असून, एनआयए अधिक तपास करत आहेत. त्यामुळे काही डॉक्टरांचीही यात चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते.
अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ कारमध्ये ठेवलेल्या जिलेटिनच्या कांड्या नागपूरमधून आणण्यात शर्माने मदत केली होती, अशी माहिती यापूर्वी अटक आरोपींची चौकशी आणि एनआयएच्या तपासात समोर आली होती. याबाबतही शर्माकडे चौकशी सुरू आहे. त्याच्या अटकेपाठोपाठ ठाणे पोलीस दलातील काही अधिकारी ‘एनआयए’च्या रडारवर आहेत. त्यांचीही लवकरच चौकशी करण्यात येणार असल्याचे समजते.
दुसरीकडे मनसुख हिरेन हे पाण्यात पडले त्यावेळी काही वेळ जिवंत होते. त्यांच्या फुप्फुसांत खाडीचे पाणी गेल्याने त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती डायटम बोन अहवालातून समोर आली होती. मात्र, मनसुख यांची आधी हत्या केली. त्यानंतर त्यांना खाडीत टाकल्याचेही एनआयएने न्यायालयात सांगितले होते. त्यामुळे डायटम अहवालाबाबतही संशय वर्तविण्यात येत आहे. पुरावे नष्ट केल्याच्या शक्यतेतून एनआयएकडून अधिक तपास सुरू आहे.
* मला अडकविण्याचा प्रयत्न!
पोलीस दलात असलेल्या गटबाजीतून मला या प्रकरणात अडकविण्यात आले आहे. संतोष हा माझा जुना खबरी असल्याचे सांगतानाच निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेशी माझा काहीच संबंध नसल्याचे प्रदीप शर्माने न्यायालयात सांगितले.
माझा निलंबित पाेलीस अधिकारी सचिन वाझे आणि या प्रकरणातील अन्य व्यक्तींशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसून, आरोपही खोटे असल्याचा दावा शर्मा यांनी एनआयएकडे केल्याची माहिती मिळते आहे.
......................................