ठाण्याचे प्रदूषण वाढता वाढे
By admin | Published: July 17, 2014 01:23 AM2014-07-17T01:23:21+5:302014-07-17T01:23:21+5:30
हवा, पाणी, ध्वनी, घनकचरा प्रदूषणात दरवर्षी वाढ होत असताना आता शहरातील वाढत असलेल्या बांधकामांमुळेही पर्यावरणावर त्याचा ताण पडत
अजित मांडके, ठाणे
हवा, पाणी, ध्वनी, घनकचरा प्रदूषणात दरवर्षी वाढ होत असताना आता शहरातील वाढत असलेल्या बांधकामांमुळेही पर्यावरणावर त्याचा ताण पडत असल्याची बाब महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून उघड झाली आहे. शांतता क्षेत्रातील प्रदूषणातही मागील वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे नौपाडा भागातील शाहू मार्केट परिसर हवा आणि ध्वनी प्रदूषणात आघाडीवर असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात दिवसेंदिवस अनधिकृत आणि अधिकृत बांधकामांची संख्या वाढत आहे. वागळे इस्टेट, बाळकुम व कोलशेत हे औद्योगिक विभाग आहेत. त्यात रासायनिक, अभियांत्रिकी, कापड उद्योग व विद्युतकामांवर आधारित उद्योग आहेत. परंतु, आता गेल्या काही वर्षांत औद्योगिक क्षेत्राचे रूपांतर रहिवासी क्षेत्रात झाले आहे. रहिवासी क्षेत्रात याचे रूपांतर झाल्याने तेथे व्यावसायिक व रहिवासी विकास दिसून येत आहे. शहरात अनेक मॉल्स, मल्टीप्लेक्स, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात वाढ होत आहे. मुंबईतील अनेक कार्यालयांचा विकासही ठाणे शहरात होताना दिसत आहे. तसेच यामुळे बांधकाम उद्योगाचे प्रमाण वाढले आहे. मुंबईकरांना पर्यायी जागा म्हणून ठाणे शहराकडे पाहिले जात आहे. म्हणूनच अनेक मोठे विकासक ठाण्याकडे धाव घेत असून येथे इमारतींचे इमले उभे राहत असल्याचे अहवालात नमूद केले आहे. शहरात आजघडीला २ लाख २४ हजार ६८७ एवढ्या झोपड्या आहेत. या वाढत्या बांधकामांमुळे पर्यावरणावर ताण पडतो आहे.