Join us  

ठाण्यात कैद्याचा पोलिसावर हल्ला

By admin | Published: February 04, 2015 2:34 AM

तळोजा कारागृहातून ठाणे न्यायालयात सुनावणीस आलेल्या गणेश शिंदे (३०) या कैद्याने घरचे जेवण देण्यास नकार देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यालाच धक्काबुक्की करून धमकी दिली.

ठाणे : तळोजा कारागृहातून ठाणे न्यायालयात सुनावणीस आलेल्या गणेश शिंदे (३०) या कैद्याने घरचे जेवण देण्यास नकार देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यालाच धक्काबुक्की करून धमकी दिली. ही घटना मंगळवारी ठाण्यात घडली. याप्रकरणी ठाणे नगर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी साळुंखे हे हवालदार म्हात्रे, पोलीस नाईक म्हात्रे आणि महिला पोलीस शिपाई गायकवाड यांच्यासह गणेशला २ फेब्रुवारी रोजी ठाण्याचे अतिरिक्त सह तदर्थ जिल्हा न्यायाधीश एम. एम. वलीमहंमद यांच्या न्यायालयात सुनावणीस घेऊन आले होते. त्यानंतर पुढची तारीख मिळाल्यामुळे त्याला घेऊन साळुंखे पोलीस व्हॅनमधून जात असताना न्यायालयाच्या समोरील रस्त्यावरच गणेशचा भाचा अजित सुडके, पत्नी ममता यांच्यासह इतर नातेवाईक जेवण आणि इतर साहित्य घेऊन आले. ते गणेशला देण्याबाबत त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे परवानगी मागितली. तेंव्हा ‘जे काही द्यायचे ते जेलमध्ये द्या’ असे सांगत पोलिसांनी गणेशला गाडीत बसण्यास सांगितले. त्यावर संतापलेल्या गणेशने पोलिसांशी बराच वेळ हुज्जत घाल लागला. तेव्हा न्यायालयाच्या आदेशाशिवाय घरचे जेवण देता येणार नसल्याचे साळुंखे यांनी सांगितले. यावरून गणेशने धक्काबुक्की करून पोलीस व्हॅनच्या काचा फोडल्या. या कैद्याला नंतर पोलिसांनी ठाणेनगर पोलिसांच्या ताब्यात दिले. (प्रतिनिधी)च्नवी मुंबईच्या पोलिसांवर हल्ला करणाऱ्या गणेशने याआधीही असे कृत्य केले आहे. २०१३ मध्ये जेलमध्येच पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात तर पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध २०१४ मध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीसांनी दिली.