मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 04:04 AM2019-09-24T04:04:11+5:302019-09-24T04:04:28+5:30

विद्यार्थ्यांचे स्वच्छतागृह अस्वच्छ; हाउसकीपिंग एजन्सी नेमण्याची मागणी

Thane Sub-station of Mumbai University | मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राची दुरवस्था

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्राची दुरवस्था

Next

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या ठाणे उपकेंद्रातील समस्या मांडणारे टिष्ट्वट उपकेंद्रातील विद्यार्थिनीने केले आहे. उपकेंद्राच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून, विद्यार्थ्यांच्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. मुंबई विद्यापीठाचा वाढता आवाका लक्षात घेता, ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मुंबईवारी करावी लागू नये, या उद्देशाने ठाण्यात मुंबई विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू करण्यात आले होते. ते सुरू करताना त्याला राष्ट्रीय दर्जा देण्याचे स्वप्न दाखविण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात या उपकेंद्राची दुरवस्था झाल्याचे पाहायला मिळते.

२०१४ साली ठाणे उपकेंद्रात अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी मिळाली असून सध्या येथे बीएमएस, बीबीए, एमबीए, एलएलबी हे अभ्यासक्रम इंटिग्रेटेड पद्धतीने सुरू आहेत. जवळपास ४०० विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत. मात्र, दुरस्थ शिक्षण घेणाऱ्या या विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही सोईसुविधा उपलब्ध नाहीत. विजेची पुरेशी व्यवस्था नाही. शिवाय अद्याप ओळखपत्रेही देण्यात आली नसल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे. वारंवार तक्रारी करूनही यावर कार्यवाही न झाल्याने अखेर विद्यार्थ्यांनी ट्विट करून आपल्या समस्या मांडल्या आणि सिनेट सदस्यांना यामध्ये टॅग केले. या ट्विटची दखल घेत सिनेट सदस्यांनी ठाणे उपकेंद्राची भेट घेतली असता या दुरवस्थेचे चित्र समोर आले.

उपकेंद्राच्या संचालिका सुनीता मगरे या दोन आठवड्यांतून फक्त एकदा येतात. विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या मांडणारे पत्र मार्च २०१९ रोजी त्यांना दिले होते. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. विद्यार्थ्यांच्या तक्रारी ऐकण्यासाठी त्या कधीच हजर नसतात, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रामध्ये विद्यार्थ्यांची अशा पद्धतीने शैक्षणिक हेळसांड होणे हे दुर्दैवी आहे. या सर्व गोष्टींची दखल घेत सिनेट सदस्यांनी ठाणे उपकेंद्रासाठी पूर्णवेळ संचालक नेमावेत आणि स्वच्छतागृहाची नीट व्यवस्था राखण्यासाठी हाउसकीपिंग एजन्सीची नेमणूक करावी, अशी मागणी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्याकडे केली.

Web Title: Thane Sub-station of Mumbai University

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.