ठाणे : आदिवासी, दुर्गम भागातील गर्भवतींना वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे शहापूर, मुरबाड तालुक्यात बालमृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात मे ते डिसेंबर २०१४ या आठ महिन्यांत सुमारे ५९ बालमृत्यू झाले आहेत. ही गंभीर बाब जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) बैठकीत उघड झाली. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आदिवासी महिलांना वेळेवर औषधोपचार मिळत नाहीत. पोषक आहाराअभावी गर्भाची योग्य वाढ होत नाही. त्यामुळे हे बालमृत्यू झाल्याचे श्रमिक मुक्ती संघटनेच्या कायदेशीर सल्लागार अॅड. इंदवी तुळपुळे यांनी निदर्शनास आणले. शहापूर परिसरातील डोळखांब भागात या बालमृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाद्वारे कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतानाही बालमृत्यू होत आहेत़ याला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाने सतर्क राहण्याची गरज आहे, असे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. यावर उपाययोजना म्हणून सोनोग्राफी मोफत करून देण्यासाठी आरोग्य विभाग प्रस्ताव तयार करीत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी बी.एस. सोनावणे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
ठाण्यात आठ महिन्यांत झाले ५९ बालमृत्यू
By admin | Published: February 18, 2015 1:21 AM