‘त्या’ दुर्लक्षित १३ तलावांची ठाणे पालिका करणार सफाई
By admin | Published: October 24, 2015 11:30 PM2015-10-24T23:30:34+5:302015-10-24T23:30:34+5:30
‘काहीतरी कर ठाणेकर’.... ऱ्हास होणाऱ्या तलावांचा जीर्णोद्धार कर, या लोकमतच्या मोहिमेनंतर शहरात ३५ तलाव शिल्लक असताना वारंवार केवळ ५ तलावांवर लाखोंची उधळपट्टी
ठाणे : ‘काहीतरी कर ठाणेकर’.... ऱ्हास होणाऱ्या तलावांचा जीर्णोद्धार कर, या लोकमतच्या मोहिमेनंतर शहरात ३५ तलाव शिल्लक असताना वारंवार केवळ ५ तलावांवर लाखोंची उधळपट्टी करणाऱ्या ठाणे महापालिकेला अखेर जाग आली आहे. यानुसार, त्यांनी शहरातील दुर्लक्षित राहिलेल्या १३ तलावांची साफसफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ८ लाख ५८ हजार ८६१ रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यामुळे लोकमतने सुरू केलेल्या काहीतरी कर ठाणेकर या चळवळीला लाभलेले हे मोठे यश असल्याचे मत तमाम ठाणेकरांनी व्यक्त केले आहे. लोकमतच्या पाठपुराव्यामुळेच पालिकेने दुर्लक्षित राहिलेल्या तलावांची साफसफाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
गेल्या महिन्यात ‘काहीतरी कर ठाणेकर’ ही चळवळ उभी करून शहरातील तलावांच्या समस्येबाबत लोकमतने ठाणेकरांना जागृत करण्याचे काम केले होते. तसेच प्रशासनानेदेखील याकडे लक्ष देऊन केवळ पाच तलावांवर खर्च न करता शहरात जे दुर्लक्षित तलाव राहिलेले आहेत, त्यांच्याकडेही लक्ष द्यावे, असे आवाहन केले होते. त्याची माहिती महापौर संजय मोरे यांनी लोकमतकडून जाणून घेतली होती. त्यानुसार, आता ठाणे महापालिकेनेदेखील शहरातील इतर तलावांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार, आता पहिल्या टप्प्यात उत्तर भागातील म्हणजेच घोडबंदर भागातील कासारवडवली, रेवाळे, कोलशेत आणि डावला या तलावांच्या साफसफाईसाठी २ लाख ६७ हजार ५५२ रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
यासंदर्भात दक्ष नागरिक नितीन देशपांडे यांनी पालिकेकडे दोन वेळा लेखी तक्रार आणि तलावाचे छायाचित्र पाठविले आहे. परंतु, पालिकेने याकडे लक्षच दिले नव्हते. परंतु, आता या तलावांचीही सफाई केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. साफसफाईचा हा खर्च तलाव पुनरुज्जीवन, शुद्धीकरण या लेखाशीर्षकातून होणार आहे.
पृष्ठभागाची होणार साफसफाई
या मोहिमेद्वारे तलावांच्या पृष्ठभागाची साफसफाई केली जाणार आहे. तसेच मखमली तलाव, ब्रह्माळा तलाव, गोकुळनगर आणि सिद्धेश्वर तलावांच्या साफसफाईसाठी २ लाख ७० हजारांचा खर्च केला जाणार आहे. विशेष म्हणजे यातील मखमली तलावात सध्या प्रदूषण वाढले असून या तलावाच्या पाण्यावर हिरवळ पसरली आहे. दरम्यान, मुंब्य्रातील खिडकाळी, दिवा, फडकेपाडा, दातिवली, शीळ तलावांचीही सफाई केली जाणार असून यासाठी २ लाख २१ हजारांचा निधी खर्च केला जाणार आहे.
काहीतरी कर ठाणेकर, या लोकमतने सुरू केलेल्या चळवळीच्या माध्यमातून आम्ही ठाणेकरांना आश्वासन दिले होते. त्यानुसार, आता हे पाऊल उचलले आहे. याचाच एक भाग म्हणून आता या तलावांची साफसफाई केली जात आहे. परंतु, याकामी ठाणेकर नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करीत आहे. - संजय मोरे, महापौर, ठामपा