ठाण्याला जलवाहतुकीने जोडणार

By admin | Published: August 20, 2016 01:49 AM2016-08-20T01:49:18+5:302016-08-20T01:49:18+5:30

गेली कित्येक वर्षे कागदावरच असलेल्या जलवाहतूक प्रकल्पाचे काम आता खऱ्या अर्थाने मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार ठाणे खाडीतून अंतर्गत जलवाहतूक महापालिका सुरू

Thane will be connected with the navigability | ठाण्याला जलवाहतुकीने जोडणार

ठाण्याला जलवाहतुकीने जोडणार

Next

ठाणे : गेली कित्येक वर्षे कागदावरच असलेल्या जलवाहतूक प्रकल्पाचे काम आता खऱ्या अर्थाने मार्गी लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार ठाणे खाडीतून अंतर्गत जलवाहतूक महापालिका सुरू करणार आहे. यात पहिल्या टप्प्यात वसई - मीरा-भार्इंदर - ठाणे कोलशेत, घोडबंदर रोड, साकेत-दिवा, भिवंडी -कल्याण हा २५ नॉटिकल मैल म्हणजेच ४५ किमी लांबीचा ७० मिनिटांचा जलवाहतूक मार्ग प्रस्तावित केला आहे.
दुसऱ्या टप्प्यात साकेत ते गेटवे आॅफ इंडिया आणि तिसऱ्या टप्प्यात साकेत ते वाशी, सीबीडी सेक्टर ११ हे रूट जोडले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि नवी मुंबईला या जलवाहतुकीतून वगळले असले तरी ठाणे जिल्ह्यातील प्रमुख शहरांना ती जोडली जाणार आहे. मालवाहू जलवाहतूक, प्रवासी आणि पर्यटन अशा तिन्ही स्तरांवर ती सुरू होणार असल्याने वाहतुकीवरील ताण मात्र कमी होणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत पटलावर ठेवला आहे.
अशा प्रकारची जलवाहतूक सुरू करण्याचा पहिला मान ठाणे शहराला मिळणार आहे. सुरुवातीला मुंबई आणि नवी मुंबईपर्यंत जलवाहतूक सुरू करण्याचा पालिकेचा विचार होता. मात्र या ठिकाणी वाहतूक सुरू करण्यासाठी जेट्टी बांधण्याची आवश्यकता असल्याने तूर्तास या दोन शहरांना वगळले आहे. त्यामुळे ठाण्यापासून कल्याण, वसई, मीरा - भार्इंदर, भिवंडी या शहरापर्यंत जलवाहतूक सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पालिकेने दिली. यासाठी केंद्र सरकारकडे सहा महिन्यांपूर्वीच प्रस्ताव पाठवला होता. त्यामध्ये केंद्र सरकारने अशा प्रकारच्या जलवाहतुकीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
गायमुख येथे जेट्टी उभारण्यासाठी ठाणे महापालिकेने ११ कोटी मेरीटाइम बोर्डाकडे वर्ग केले असून त्यांच्या वतीने गायमुख जेट्टीचा विकास केला जाणार आहे. (प्रतिनिधी)

तीन स्तरांवर सुरू होणार वाहतूक
मालवाहू जलवाहतूक, प्रवासी आणि पर्यटन अशा तीन स्तरांवर जलवाहतूक सुरू होणार असल्याने पालिकेला यापासून चांगला महसूल मिळणार आहे. प्रवासी जलवाहतुकीमुळे रस्ते आणि रेल्वेवरील भार कमी होणार आहे. पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील ठाण्यात जलवाहतुकीचा विकास करण्यात येणार असल्याने पर्यटकांना ठाण्यात येण्यास वाव मिळणार आहे.

रस्ते वाहतुकीच्या तुलनेत जलवाहतूक ही ५० टक्के स्वस्त असल्याने ठाण्यातून एकदा जलवाहतुकीला सुरुवात झाल्यानंतर तिचा मालवाहतुकीसाठीही मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार आहे.

१३ ठिकाणी उभारणार जेट्टी
जलवाहतुकीचे जाळे पसरवण्यासाठी ठाण्यात १३ ठिकाणी जेट्टी उभारण्यात येणार आहेत. यामध्ये वाघबीळ, मुंब्रा, कळवा, कासारवडवली, ओवळा आणि ज्या ठिकाणी खाडीकिनारा आहे अशा १३ ठिकाणी त्या उभारण्यात येणार आहेत.

पहिल्या टप्प्यात वसई - मीरा-भार्इंदर - ठाणे - कोलशेत - घोडबंदर रोड - साकेत - दिवा - भिवंडी - कल्याण हा ४५ किमी लांबीचा ७० मिनिटांचा जलवाहतूक मार्ग प्रस्तावित केला आहे. यासाठी सुमारे २८७.९५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. तसेच हा प्रकल्प पीपीपी तत्त्वावर राबविण्यात येणार असून त्याची निगा देखभाल दुरुस्ती आणि त्यासाठी लागणाऱ्या इतर सुविधांसाठी एकूण ३९७ कोटींचा ढोबळ खर्च गृहीत धरला आहे. तसेच खाडीवर ब्रिज तसेच इतर कामांसाठी ७४.०१ कोटी खर्च अपेक्षित आहे.
दुसऱ्या टप्प्यात साकेत - मंडाला - ट्रॉम्बे - गेटवे आॅफ इंडिया (५४ मिनिटांचा) आणि टप्पा क्रमांक तीनमध्ये साकेत - वाशी - कर्वेनगर - सीबीडी सेक्टर - ११ (५५ मिनिटांचा) हे मार्गदेखील अमलात आणण्याचा पालिकेचा विचार आहे. तर अंतर्गत जलवाहतूक सुरू करताना घोडंबदर रोड - कोलशेत - साकेत - दिवा हा जलमार्ग व इंटरसिटी रूट ठाणे - वसई - मीरा-भार्इंदर, ठाणे - भिवंडी, ठाणे - डोंबिवली व ठाणे - कल्याण या जलमार्गांचा समावेश आहे.

Web Title: Thane will be connected with the navigability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.