ठाणे पश्चिम-पूर्वेकडील सॅटीस जोडणार!
By admin | Published: November 20, 2014 11:50 PM2014-11-20T23:50:51+5:302014-11-20T23:50:51+5:30
ठाणे स्टेशनवरील वाहनांची गर्दी कमी होऊन प्रवाशांना अधिक चांगली परिवहन सेवा मिळावी, यासाठी ठाणे पश्चिमप्रमाणे ठाणे पूर्व येथे बांधण्यात येणारा सॅटीस प्रकल्प एकमेकांना जोडण्यात यावा
ठाणे : ठाणे स्टेशनवरील वाहनांची गर्दी कमी होऊन प्रवाशांना अधिक चांगली परिवहन सेवा मिळावी, यासाठी ठाणे पश्चिमप्रमाणे ठाणे पूर्व येथे बांधण्यात येणारा सॅटीस प्रकल्प एकमेकांना जोडण्यात यावा, या खासदार राजन विचारेंच्या सूचनेला रेल्वे अधिकाऱ्यांनी अनुकूलता दर्शवली आहे़
विचारेंसह मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत ठाणे पालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक बुधवारी मध्य रेल्वेचे प्रबंधक मुकेश निगम यांच्या दालनात झाली. ठामपाचे आयुक्त असीम गुप्ता, यू.पी. सिंग, अलोक बडगर, कार्यकारी अभियंता, उपअभियंता, नवी मुंबई महापालिकेचे संजय देसाई व सिडकोचे शहर अभियंता एम. दराडे आदी उपस्थित होते.
राज्याचे विरोधी पक्षनेते व कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघाचे स्थानिक आमदार एकनाथ शिंदे यांनी ठाणे पूर्वेलादेखील सॅटीस प्रकल्प राबवण्याबाबत प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार, रेल्वेने मुंबई रेल विकास प्राधिकरणाच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. सदर प्रकल्पासाठी ठाणे महापालिकेकडून तीन चटई क्षेत्रापर्यंत वाढीव क्षेत्रफळ देण्यास आयुक्त असीम गुप्ता यांनी रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या चर्चेत तयारी दाखविली. (प्रतिनिधी)