- जितेंद्र कालेकरठाणे, दि. 13 - ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार आत्महत्येप्रकरणी कथित आरोपी असलेले सहाय्यक पोलीस आयुक्त एस. बी. निपुंगे यांनी नियंत्रण कक्षाला कळवून सिक लिव्हचा रिपोर्ट केला आहे. त्यामुळे त्यांचा चार्ज आता नियंत्रण कक्षाचे सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप गावीत यांच्याकडे देण्यात आला आहे. अर्थात, त्यांना लवकरच नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या आत्महत्येच्या घटनेनंतर म्हणजे ६ सप्टेंबर पासून कळवा पोलिसांसह मुख्यालयाचे उपायुक्त संदीप पालवे किंवा उपायुक्त डॉ. प्रिया नारनवरे यांच्यापैकी कोणालाही निपुंगे यांनी संपर्क केलेला नाही. त्याऐवजी त्यांनी ठाणे शहर नियंत्रण कक्षाला संपर्क साधून प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण दाखवून सिक रजेचा रिपोर्ट केला. या रिपोर्टची माहिती मुख्यालय एकच्या उपायुक्त डॉ. नारनवरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी सोमवारी याबाबतची माहिती ठाणे शहर आयुक्तालयातील त्यांच्या सर्व विभागांना कळविली आहे. तर त्यांचे थेट वरीष्ठ असलेले मुख्यालय दोनचे उपायुक्त संदीप पालवे यांच्याकडेही त्यांनी केवळ सिक रजा टाकल्याची जुजबी नियंत्रण कक्षाकडूनच देण्यात आली आहे. परंतू, ६ सप्टेंबर नंतर त्यांनी कोणताही संपर्क केला नसल्याचे पालवे यांनी सांगितले. आणखी दोन दिवस वाट पाहून त्यांनी नेमकी कोणत्या आजारासाठी रजा घेतली, त्याचे योग्य प्रमाणपत्र सादर करावे. किंवा स्वत: हजर व्हावे, अशा आशयाची त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी नोटीस बजावली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अर्थात, ज्या कारणामुळे निपुंगे तडकाफडकी गैरहजर राहिले आहेत, त्याबाबतचा विचार केल्यास त्यांची रजा मंजूर होणे, हे अशक्य असल्याचे एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे एकीकडे प्रशासनाच्या दृष्टीने ते हजर होण्याची नोटीस तर दुसरीकडे कळवा पोलिसांच्या तपास पथकाकडून त्यांचा आत्महत्या प्रकरणात शोध घेण्यात येत आहे. तूर्त त्यांचा चार्ज आता नियंत्रण कक्षाचे सहायक आयुक्त दिलीप गावीत यांच्याकडे प्रशासनाने सुपूर्द केला आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर गावीत यांनी मुख्यालयाचा प्रभारी अधिकारी म्हणून पदभार स्विकारला आहे. असे असले तरी या प्रकरणाची पोलीस वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
‘कुठेही आणि कितीही पळाले तरी ते त्यांनाच त्रासदायक’पोलीस खात्यातील काही वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निपुंगे या प्रकरणात एक संशयित आरोपी आहेत. ते स्वत: एक वरीष्ठ पोलीस अधिकारीही आहेत. त्यामुळे कायद्याची आणि न्यायालयाची त्यांना चांगली माहिती आहे. असे असताना तपास अधिकाऱ्यांसमोर येऊन आपली बाजू मांडण्याऐवजी त्यांनी केवळ सिक लिव्ह टाकून गायब होणे हे त्यांच्यावरील संशयाची सुई अधिक अधोरेखित करण्यासारखे आहे. मंगळवारी सहाव्या दिवशीही तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ किंवा नाशिक आणि पुणे येथे गेलेल्या अन्य दोन शोध पथकांनाही त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे या प्रकरणात आता तरी ठोस सांगण्यासारखे काही नसल्याचे ठाण्याचे पोलीस उपायुक्त डी. एस. स्वामी यांनी सांगितले. मात्र, या प्रकरणाची सर्व बाजूंनी कसून चौकशी सुरु असल्याचंही ते म्हणाले.
तर कायद्याची संपूर्ण माहिती असूनही निपूंगे यांनी कुठेतरी पळ काढणे हेच संशयाला जागा करण्यासारखे आहे. त्यामुळे ते कितीही आणि कुठेही पळाले तरी ते त्यांनाच त्रासदायक ठरणारे असल्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग म्हणाले.