ठाणे : ‘काहीतरी कर ठाणेकर’ या लोकमतने चालवलेल्या चळवळींतर्गत वागळे इस्टेट येथील रायलादेवी तलाव येथे शुक्रवारी सायंकाळी ठाणेकरांनी एकीकडे सहलीचा आनंद लुटला, तर दुसरीकडे शहरातील सर्वच तलावांचा ऱ्हास रोखण्यासाठी ठाणेकरांसह महापालिकेस साद घातली. या वेळी प्रशासनाकडून दुर्लक्षित झालेल्या या तलावांचे ठिकाण मौजमजेचे ठिकाण बनू शकते, यासाठी महापौर संजय मोरे यांना समस्त ठाणेकरांच्या वतीने लोकमतने एक सविस्तर निवेदन दिले. या उपक्रमात महापौरांनी भरपावसात उपस्थित राहून सक्रिय सहभाग दर्शवलाच, शिवाय लोकमतने चालविलेल्या या चळवळीनिमित्त स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे बनविण्याच्या संकल्पनेला पुन्हा एकदा नव्याने प्रेरणा मिळाल्याचे आवर्जून सांगितले. तसेच लोकमतने सादर केलेल्या निवेदनातील सर्वच विषयांवर महापालिका सकारात्मक निर्णय घेईल, अशी ग्वाही दिली.या वेळी ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांनी शहर स्वच्छता अभियानावर भाष्य करणारेपथनाट्य सादर केले. त्यानंतर, स्वस्तिक या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन शस्त्रास्त्र, दांडपट्टा तसेच लाठीकाठी आदी खेळ खेळून उपस्थितांना आश्चर्यचकित केले. या वेळी लोकमतचे सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला, वरिष्ठ महाव्यवस्थापक (आॅपरेशन) निनाद देसाई, सहायक महाव्यवस्थापक राघवेंद्र शेट तसेच विशेष मुलांसाठी संस्था चालविणाऱ्या मीनल मंडलिक, स्वत्व संस्थेच्या अध्यक्ष स्वाती दीक्षित, सिद्धान्त प्रतिष्ठानच्या साधना प्रधान, स्वच्छता अभियानचे हेमंत भांगे, जाग या संस्थेचे संजय मंगो, विरोधी पक्षनेते हनुमंत जगदाळे, नगरसेवक रवींद्र फाटक, नगरसेवक मीनल संख्ये आदी मान्यवर उपस्थित होते. आपल्या प्रतिक्रिया लोकमतच्या फेसबुकपेजवर कळवा..
www.facebook. com/kahitarikarthanekar